(संग्रहित प्रतिमा)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मिर्जापूर (Mirzapur) जिल्ह्यातील एक निवृत्त पोलीस अधिकारी (Retired Cop) चक्क आपल्या मृत मुलीच्या मृतदेहासोबत राहात असल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची नोंद घेतली असता हा अधिकारी खरोखरच आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत राहात असल्याचे पुढे आले. पोलिसांनी मृतदेह तातडीने ताब्यात घेतला.

प्राप्त माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील कटरा गाव परिसरात घडली. पोलिसांना ताब्यात घेतलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त होण्याची पोलीस वाट पाहात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

स्थानिकांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे नाव दिलावर सिद्दीकी याच्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सिद्दीकी याचे घर उघडले असता त्यांना मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी आणि त्याची पत्नी हे आपल्या मुलीला जिवंत समजून तिच्यासोबत राहात होते. ते तिचा मृतदेह सोबत बाळगून होते. (हेही वाचा, पुणे: 17 वर्षापूर्वी दोन मित्रांनी केलेल्या हत्येचे गूढ उकलले, या वर्षी करण्यात आले सांगाड्यावर अंत्यसंस्कार)

पोलीस अधीक्षक (एसपी) प्रकाश स्वरुप पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शरीर हे साधारण एक महिन्या पूर्वीचे असावे. 15 ते 20 दिवसांपूर्वीही पोलिसांना दिलावर सिद्दीकी याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी त्या घराला भेट दिली होती. मात्र, त्या वेळी सर्व काही ठिक वाटल्याने पोलिसांनी अधिक तपास केला नव्हता. दरम्यान, शेजारी आणि नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी घराला भेट दिली आणि मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असावा अशी शक्यताही प्रकाश स्वरुप पांडेय यांनी व्यक्त केली. पोलीस पूढील तपास करत आहेत.