Clashes in Maujpur | (Photo Credits: ANI)

राजधानी दिल्लीच्या (Delhi) शाहीन बागेत (Shaheen Bagh) नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) चालू असलेल्या निदर्शनास सुमारे 68 दिवस झाले आहेत. परंतु अजून हा निषेध थांबला नाही. या निदर्शनासंदर्भात सुप्रीम कोर्टाने वाटाघाटी करण्यासाठी एक टीम देखील तैनात केली होती, तरी त्या संवादामुळे कोणताही तोडगा निघाला नाही.

शाहीन बाग येथे असलेल्या निषेधामुळे, सरिता विहार आणि जसोला येथील रहिवाशांनी आता सीएएच्या निषेधाचा निषेध केला. यासह शाहीनबागमधील निषेधामुळे बंद झालेले सर्व मार्ग खुले करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

सरिता विहार, मदनपूर खादर आणि जसोला येथील स्थानिक नागरिक फरीदाबाद रोड सुरू करण्याच्या मागणीसाठी, पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. लोकांनी शाहीन बाग मेट्रो स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखला आहे. फरीदाबाद रस्ता उघडल्याशिवाय ते रस्त्यावरुन उठणार नाहीत, असे निषेध करणार्‍या लोकांनी सांगितले. लोक म्हणत आहेत की, जामिया युनिव्हर्सिटी ते शाहीन टॅप नंबर 9 च्या कालिंदी कुंज पर्यंतचा मार्ग खुला आहे. यामुळे जामिया, बाटला हाऊस आणि शाहीन परिसरातील लोकांना याचा फायदा होत आहे. उर्वरित लोकांना याचा काही फायदा नाही. त्यामुळे फरीदाबाद रस्ताही खुला करावा जेणेकरून त्यांनाही दिलासा मिळेल. (हेही वाचा: भारतमाता की जय या घोषणेचा राजकीय जहाल फायद्यासाठी अतिरेकी वापर: मनमोहन सिंह)

शाहीन बागेत एक मार्ग उघडल्यानंतर, काही तासांनंतरच उत्तर-पूर्व दिल्लीत निदर्शने सुरू झाली. इथल्या जाफराबादनंतर लोक चांदबगमध्ये रोड जाम करून निषेध करत आहेत. दोन्ही ठिकाणी महिला रस्त्यावर बसल्या आहेत. येथे सुरू असलेल्या निषेधामुळे सीलमपूर ते यमुना विहार आणि वझीराबाद ते गाझियाबादकडे जाणार्‍या वाहतुकीवर वाईट परिणाम झाला आहे. या निषेधामुळे घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात आहेत. त्याच वेळी, गाझियाबाद ते वजीराबादकडे जाणारा रस्ता खुला आहे. चांदबाग रस्ता बंद झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.