भोपाळमध्ये रुग्णालयातून 800 हून अधिक रेमिडेसिव्हर इंजेक्शनची चोरी झाल्याने खळबळ
Remdesivir Vaccine (Representational Image ) Photo Credit: ANI

देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही ठिकाणी या इंजेक्शनची चोरी झाल्याच्या गोष्टी सुद्धा समोर आल्या आहेत. अशातच आता भोपाळ येथील हमीदिया रुग्णालयातून रेमिडेसिव्हर इंजेक्शनची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सुरुवातीला 816 रेमिडेसिव्हर इंजेक्शनची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

भोपाळ मध्ये काही दिवसांपूर्वी रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा नवा साठा आला होता, कोहेफिजा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. चोरीची घटना समोर आल्यानंतर मंत्री विश्वास सारंग आणि डीआयजी इरशाद वली दाखल झाले.(रेल्वेस्थानकाच्या परिसरात मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार, भारतीय रेल्वेकडून निर्णय जाहीर)

मध्य प्रदेशात रेमिडेसिव्हर इंजेक्शची चोरी झाल्याची ही पहिलीच घटना आहे. मंत्री विश्वास सारंग यांनी असे म्हटले आहे की, चोरीचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून याचा तपास करणे आवश्यक आहे. तर वली यांनी असे म्हटले की, चोरी गुन्हाअंतर्गत कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्या ठिकाणाहून इंजेक्शनची चोरी झाली तेथील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा अद्याप तपासून पाहिलेले नाहीत. मात्र लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल.(कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश)

देशभरात रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी तुफान वाढत आहे. काही ठिकाणी याचा काळाबाजार सुद्धा केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु प्रशासन या संदर्भात अलर्ट आणि आरोग्य मंत्रालयाने सुद्धा काळाबाजार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे म्हटले आहे.