Red Fort Violence And Flag Hoisting: लाल किल्ल्यातील हिंसाचारात सामील असलेल्या दीप सिद्धू आणि इतरांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचे इनाम जाहीर
Deep Sidhu (Photo Credits: Twitter)

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेडनंतर झालेल्या हिंसाचारामधील आरोपांची धरपकड चालू आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी पंजाबी अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता दीप सिद्धूबाबत (Deep Sidhu) मोठी घोषणा केली आहे. पोलिसांनी बुधवारी सिद्धू आणि अन्य तीन आरोपींची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सिद्धूने फेसबुकवर व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि सांगितले होते की तो पोलिसांसमोर आत्मसमर्पण करेल, मात्र तसे होऊ शकले नाही. पोलिसांनी दीप सिद्धू व्यतिरिक्त जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंग यांच्या माहितीसाठी एक लाखाचे बक्षीस ठेवले आहे.

यासह जजबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्याविषयी माहिती देणार्‍याला दिल्ली पोलिसांनी प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ज्या वेळी दिल्लीत दंगल चालू होती, त्यावेळी दीप सिद्धू लाल किल्ल्यातच उपस्थित असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. त्याठिकाणी तो चिथावणीखोर भाषण देत होता. मात्र या हिंसाचारानंतर तो पळून गेला. पोलिसांनी दीप सिद्धूविरोधात गुन्हादेखील दाखल केला आहे. जेव्हा पोलिस आयुक्तांना दीप सिद्धूबाबत विचारणा केली तेव्हा, हिंसाचारात सामील असलेल्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचे ते म्हणाले.

दिल्लीहून पळून गेल्यानंतर दीप सिद्धू याचे लोकेशन हरियाणा होते, त्यानंतर त्याचे लोकेशन पंजाब झाले. यानंतर तो बिहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, परंतु अद्याप तो पकडला गेला नाही. सध्या अनेक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत आहेत, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा आहे. (हेही वाचा: किसान ट्रॅक्टर रॅलीनंतर 100 हून अधिक लोक बेपत्ता झाल्याचा दावा; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी जारी केला हेल्पलाईन क्रमांक)

दरम्यान, 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 38 गुन्हे दाखल केले आहेत आणि 84 लोकांना अटक केली आहे. हिंसाचारादरम्यान 300 हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत.. मोर्चाच्या वेळी ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला आहे.