Rape in Ambulance: आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयात घेऊन जात असताना महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोग्य कर्मचाऱ्याला अटक
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

केरळमधील (Kerala) त्रिशूरमधून (Thrissur) एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून वैद्यकीय महाविद्यालयात नेले जात होते. यादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्याने रुग्णवाहिकेमध्ये तिच्यावर बलात्कार (Rape) केला आहे. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणाची माहिती दिली. महिलेच्या तक्रारीनंतर कोडुंगल्लूर तालुका रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला तात्काळ कोडुंगल्लूर येथील तालुका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे गेल्यावर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर करण्यात आले. महिलेला रुग्णवाहिकेमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले जात होते. तिच्यासोबत एक कर्मचारीही रुग्णवाहिकेतून जात होता. याच कर्मचाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला.

महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाइकांना याची माहिती मिळताच त्यांनी तिला कोडुंगल्लूर रुग्णालयात नेले. मात्र तिथे तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला त्रिशूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. कोडुंगल्लूर रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित होत असताना रुग्णालयातील कर्मचारी दयालाल याला रुग्णवाहिकेसोबत येण्यास सांगितले, त्यादरम्यान दयालालने रुग्णवाहिकेमध्ये महिलेवर बलात्कार केला. (हेही वाचा: कलियुगी मुलगी! घरात झोपलेल्या वडिलांची धारदार शस्त्राने वार करत केली हत्या)

पीडितेने सुरुवातीला नर्सला हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना रुग्णालयातच पाचारण करण्यात आले. संधी पाहून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याला पकडले. याप्रकरणी केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला तत्काळ पदावरून हटवण्यात आले असून, पुढील चौकशी सुरु आहे.