Rape: वडिलांचा अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; मुलगी गर्भवती, न्यायालयाने आरोपीला सुनावली 106 वर्षांची शिक्षा
Representational Image (Photo Credits: Pixabay)

केरळमधील (Kerala) एका विशेष न्यायालयाने 2015 पासून आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत, वडिलांना अनेक गुन्ह्यांसाठी 106 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. वारंवार बलात्कार झाल्यानंतर 2017 मध्ये मुलगी गरोदर राहिली होती. आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश उदयकुमार यांनी त्या व्यक्तीला 106 वर्षांची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, तिला गरोदर राहण्यास भाग पाडणे, 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार आणि पालक किंवा रक्ताचे नातेवाईक यांच्याकडून बलात्काराच्या अशा अनेक स्वतंत्र गुन्ह्यासाठी 25-25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

मात्र दोषीला केवळ 25 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल कारण न्यायालयाने सांगितले की शिक्षा एकाच वेळी चालेल. या दोषीला नेयट्टींकारा येथील फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाने आणखी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पाच गुन्ह्यांसाठी न्यायालयाने त्याला एकूण 17 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. राज्यातर्फे विशेष सरकारी वकील (एसपीपी) अजित थंकय्या यांनी सांगितले की, मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना 2017 मध्ये उघडकीस आली.

माहितीनुसार, सुरुवातीला आई आणि पोलिसांकडे विचारणा करूनही त्यांनी गुन्हेगार कोण हे उघड केले नाही. नंतर जेव्हा मुलीला समुपदेशनासाठी बाल कल्याण केंद्रात (CWC) पाठवण्यात आले तेव्हा तिने उघड केले की तिचे वडील दोन वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत आहेत. तेव्हा ती सातव्या वर्गात होती. बलात्काराबद्दल कोणालाही सांगू नको, अन्यथा पोलीस दोघांनाही अटक करतील असे या वडिलाने आपल्या मुलीला सांगितले होते. (हेही वाचा: सोलापूर येथे पोटच्या 8 वर्षाच्या लेकीवर बापाचा दोन वर्षांपासून बलात्कार; आईने दाखल केली तक्रार, आरोपी ताब्यात)

आरोपी वडिलांना 2017 मध्ये अटक करण्यात आली होती आणि न्यायालयाने त्याने जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळला होता. एसपीपी म्हणाले की, विशेष न्यायालयाने पीडितेचे म्हणणे ऐकले आणि डीएनए पुराव्याच्या आधारे वडिलांना  दोषी ठरवले. दरम्यान, अशीच वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी तामिळनाडू येथे समोर आली होती. येथे एका 15 वर्षाच्या मुलीवर चक्क तिच्या वडिलांनी आणि आजोबांनी बलात्कार केला आहे, यामुळे ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती.