धक्कादायक! सोलापूर येथे पोटच्या 8 वर्षाच्या लेकीवर बापाचा दोन वर्षांपासून बलात्कार; आईने दाखल केली तक्रार, आरोपी ताब्यात
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फसणारी एक धक्कादायक घटना सोलापूर (Solapur) येथे घडली आहे. येथे आपल्या पोटाच्या 8 वर्षांच्या पोरीवर बलात्कार (Rape) करणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मुलीच्या आईनेच आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 2 मार्च रोजी या विकृत बापाला ताब्यात घेण्यात आले.

महत्वाचे म्हणजे जीवे मारण्याची धमकी देत गेले दोन वर्षे हा बाप आपल्या मुलीवर अत्याचार करीत होता. सोलापुरातील माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी पीडित चिमुरडी इयत्ता दुसरीत शिकत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे की, आपल्या नवऱ्याने म्हणजेच, या मुलीच्या बापाने तिच्यावर बलात्कार करून, ही गोष्ट कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आईच्या म्हणण्यानुसार तब्बल दोन वर्षे हा प्रकार सुरु होता. 19 फेब्रुवारीच्या रात्रीदेखील घरात कोणी नसताना बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला होता. मुलगी झोपल्यानंतर पतीने तिला उठवून तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप महिलेने केला आहे.

(हेही वाचा: 12 वर्षाच्या मुलीवर 10 वीच्या विद्यार्थ्यांचा सामुहिक बलात्कार व खून; 7 अल्पवयीन मुलांना अटक)

हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्यात येईल अशी धमकी हा बाप आपल्या मुलीला देत असे. अखेर आईच्या हा प्रकार लक्षात आल्यावर तिने माढा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या मुलीची वैद्यकीय तपासणी सुरु आहे. पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याआधी पोटच्या पोरीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापाला दिल्ली हायकोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या प्रकरणामध्ये मुलगी गर्भावती राहिली होती.