जानेवारीमध्ये एका ओळखीच्या 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्यानंतर पोलिसांची अटक टाळण्यासाठी, आरोपी व्यक्ती तब्बल 400 किलोमीटर पायी चालला आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी गुडगावहून मध्य प्रदेशातील त्याच्या गावी पायी चालत गेला. कोणत्याही प्रकारचा मागमूस लागू नये व त्यामुळे पोलिसांना आपला शोध लागू नये म्हणून या व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला नाही. संपूर्ण 400 किमीचे अंतर त्याने पायीच कापले. अखेर गुरुवारी मध्यप्रदेशातील त्याच्या गावातून त्याला अटक करण्यात आली.
दरे उर्फ गोविंद असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून गोविंदचा शोध चालू होता. यादरम्यान मानवी बुद्धिमत्ता आणि टेक अशा दोन्ही बाबी वापरून केलेल्या तपासात दिसून आले की, आरोपी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून वारंवार त्याचे फोन बदलत होता.
महत्वाचे म्हणजे गुन्हा करण्याची गोविंदची ही पहिलीच वेळ नव्हती. त्याला 2020 मध्ये देखील त्याच्या पत्नीच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या भागातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने तिच्या तीन वर्षांच्या नातीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या बलात्काराबाबत लेखी तक्रार दिली तेव्हा ही बाब उघडकीस आली.
या तक्रारीच्या आधारे, स्थानिक पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व तपास सुरु झाला. अखेर मध्य प्रदेशातील नरसिंगपूरच्या बरभान गावातून आरोपीला पकडण्यात आले. संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीच्या पोलीस चौकशीत तो गुडगावमध्ये मजूर म्हणून काम करत असून, झोपडपट्टीत राहत असल्याचे उघड झाले. बलात्कार प्रकरणातील मुलीच्या घराशेजारी तो राहत होता. 12 जानेवारी रोजी तक्रारदार (मुलीची आजी) बाहेरगावी असताना आणि मुलीचे वडील कामावर गेले असताना आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. (हेही वाचा: UP Shocker: सेक्ससाठी नकार दिला म्हणून मांत्रिकाने केली महिलेची हत्या; ओळख लपवण्यासाठी जाळले शरीर)
त्यानंतर पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी तो गुडगावपासून 400 किलोमीटर चालत त्याच्या बरभान या गावी गेला आणि अटक होईपर्यंत तिथे मजूर म्हणून काम करू लागला. पोलिसांनी जेव्हा त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्याच्यावर फरीदाबादमध्ये हत्येचा प्रयत्न आणि मध्य प्रदेशात प्राणघातक हल्ला असे दोन गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले.