डेरा सच्चा सौदा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim Singh) याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आणखी एका गुन्ह्यात हरियाणा विशेष सीबीआय न्यायालय (CBI Court) गुरमीत राम रहीम याला रणजीत सिंह हत्याकांड (Ranjit Singh Murder Case) प्रकरणात शिक्षा ठोठावणार आहे. या खटल्यात गुरमीत याच्यासह इतरही 4 जणांना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंचकूला पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पोलिसांनी 17 नाके आणि जवळपास 700 पोलीस तैनात केले आहेत. गुरमीत राम रही सध्या सुनरिया कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. हत्या प्रकरणात गुरमीत याला आता तिसऱ्यांदा शिक्षा ठोठावली जाणार आहे.
गुरमीत राम रहीम याचे एकूण वर्तुळ आणि त्याला यापूर्वी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेवेळी झालेला गोंधळ ध्यानात घेऊन पोलिसांनी चोख सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. या आधी जेव्हा गुरमीत राम रहीम याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेव्हा त्याच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला होता. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या. (हेही वाचा, Ranjit Singh Murder Case: डेरा सच्चा सौदा चे Gurmeet Ram Rahim रणजीत सिंहच्या हत्या प्रकरणामध्ये दोषी; हरियाणा सीबीआय स्पेशल कोर्टाचा निर्णय)
रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात कोर्टाने रहीम सिंह आणि कृष्ण कुमार यांना कोर्टाने 8 ऑक्टोबर रोजी दोषी ठरवले होते. भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या), 120-बी (गुन्ह्याबाबत कट रचने) या आरोपाखाली दोषी ठरवले होते. तसेच, याच प्रकरणात अवतार, जसवीर आणि सबदिल यांनाही कोर्टाने भारतीय दंड संहिता कलम -302, 120-बी आणि आर्म्स एक्ट अन्वये दोषी ठरवले आहे.
या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे होणार आहे. राम रहीम व्हीडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर होईल. यात एक वकील त्याच्या वतीने सीबीआय न्यायालयात हजर राहील. दोषी कृष्ण कुमार, अवतार, जसवीर आणि सबदिल यांना कोर्टासमोर हजर केले जाईल.