Amar Singh Passes Away: राज्यसभा सदस्य आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन
Amar Singh (Photo Credits: Twitter, @AmarSinghTweets)

राज्यसभा सदस्य आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह (Amar Singh) यांचे शनिवारी दुपारी, वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. अमरसिंह बराच काळ आजारी होते व जवळपास सहा महिन्यांपासून सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत फक्त त्यांची पत्नी होती. मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, अमर सिंह हे आयसीयूमध्ये होते. यापूर्वी 2013 मध्ये अमर सिंह यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. अमर सिंह यांचा जन्म 27 जानेवारी 1956 रोजी आजमगड येथे झाला होता.

आज अमरसिंह यांनी ट्वीटरवर स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली होती आणि लोकांना ईदच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. अमरसिंह यांचे प्रोफाइल पाहता असे दिसून येते की, आजारी असूनही ते सोशल मीडियावर बर्‍यापैकी अ‍ॅक्टिव होते. समाजवादी पक्षाचे कट्टर नेते असलेल्या अमर सिंह यांचा मार्च महिन्यात एक व्हिडिओ चर्चेत होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूची बातमी ही अफवा असल्याचे सांगितले होते. आपले पूर्वीचे अनुभव सांगताना ते म्हणाले की, त्यांची तब्येत यापूर्वीदेखील खालावली होती, परंतु प्रत्येक वेळी मृत्यूशी लढा देऊन ते परत आले.

(हेही वाचा: विशाखापट्टणम येथे मोठा अपघात; हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळून 11 कामगारांचा मृत्यू (Video))

अमर सिंह हे समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस तसेच राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. ते सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे अगदी जवळचे होते. मात्र, 2010 मध्ये त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता व नंतर त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले. ते पहिल्यांदा 1996 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. अमर सिंह हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक संसदीय समित्यांचे सदस्यही होते.