Rajasthan Wedding: काय सांगता? 17 भावंडांनी एकाच मांडवात आपापल्या जोडीदाराशी बांधल्या लग्नगाठी; बिकानेरमधील लग्नसोहळा सोशल मिडियावर व्हायरल (Photo)
Rajasthan Wedding (Photo Credit : Pixaby)

भारतीय समाजात ‘लग्न’ (Wedding) हा एक मोठा सोहळा किंवा उत्सव असतो. आपल्या मुलांचे थाटामाटात साजरे करणे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. अनेक भारतीय कुटुंबांमध्ये पालक आपल्या आयुष्याच्या कमाईचा मोठा हिस्सा आपल्या मुलांच्या लग्नात खर्च करतात. आता राजस्थानमधून (Rajasthan) एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे, जिथे एक नाही, दोन नाही तर तब्बल 17 भावंडांनी एकाच मांडवात आपापल्या जोडीदाराशी लग्नगाठी बांधल्या आहेत. या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मिडियावर व्हायरल झाली असून, ज्यामध्ये 100 हून अधिक नावांचा समावेश आहे.

राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील नोखा भागातील एका गावात हा विवाहसोहळा पार पडला आहे. गावातील सूरजाराम गोदरा यांनी आपल्या 17 नातवंडांचे एकाचवेळी लग्नाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचे 5 नातू व 12 नाती यांचा विवाहसोहळा पार पडला.

या लग्नासाठी विविध गावांतून 12 वरांचे वऱ्हाड आले होते. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकत्र आले. सुमारे 350 ते 400 वाहनांतून हे वऱ्हाड आले होते. ही वऱ्हाडाची मिरवणूक थांबविण्यासाठी तसेच त्यांचे नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लग्नाला 6 हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित होते. सुरजाराम गोदरा यांच्या संयुक्त कुटुंबातील 123 जणांची नावे लग्नपत्रिकेत लिहिली होती. गोदरा कुटुंब आजही एकत्र राहते. (हेही वाचा: Kanyadaan Not Necessary For Hindu Marriage: हिंदू विवाह सोहळ्यासाठी 'कन्यादान' आवश्यक नाही, सप्तपदी महत्वाची- High Court)

पहा लग्नपत्रिका-

सूरजाराम गोदरा यांना पाच मुलगे आहेत- ओमप्रकाश, गोविंद, मगनाराम, भगीरथ आणि भेराराम. या पाच जणांना 17 मुले आहेत, ज्यामध्ये 5 मुलगे आणि 12 मुलींचा समावेश आहे. यातील 5 मुलांची लग्ने सोमवारी, 1 एप्रिल रोजी पार पडली, तर 12 मुलींची लग्ने 2 एप्रिलला लागली. संयुक्त कुटुंबात लग्नाच्या नावाखाली होणारा फालतू खर्च टाळण्याचा संदेश देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे कुटुंबाने सांगितले.