Rajasthan: दारूच्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी दोन महिलांमध्ये चढाओढ; 72 लाखापासून सुरु झालेली बोली 510 कोटींवर थांबली, रात्री 2 वाजेपर्यंत चालला लिलाव
Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या दारूच्या दुकानांचा (Liquor Shop) लिलाव सुरू आहे. अशा दुकानांचा ताबा घेण्यासाठी अनेक लोक पुढे आले आहेत. यामध्ये हनुमानगड जिल्ह्यातील कुईंयां गावात दारूच्या दुकानासाठी लावण्यात आलेली बोली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या दारूच्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये स्पर्धा सुरु होती. या दारूच्या दुकानाची बोली 72 लाखांपासून सुरू झाली आणि सातत्याने ती वाढत गेली. सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेला हा लिलाव रात्री 2 वाजेपर्यंत चालला व या दुकानासाठी शेवटची विक्रमी अशी 510 कोटींची बोली लावण्यात आली.

राज्यात दारूच्या दुकानाचा ताबा घेण्यासाठीच्या ऑनलाईन लिलाव प्रक्रियेदरम्यान हनुमानगड जिल्ह्यातील नोहर तहसीलच्या खुईयां या गावात दारूच्या दुकानासाठी लागलेली ही बोली 510 कोटी 10 लाख 15 हजार 400 रुपये आहे. उत्पादन शुल्क विभागाने या दुकानासाठी रिझर्व्ह प्राईझ 72 लाख ठेवले होते. राज्यातील दारूच्या दुकानाची ही सर्वात विक्रमी बोली आहे. उत्पादन शुल्क अधिकारी चिमणलाल मीणा म्हणाले की, बोली लावणाऱ्या किरण कंवर यांना डिमांड नोटीस पाठविली गेली आहे. त्यांना तीन दिवसांत पैसे जमा करण्यासाठी लिहिले आहे.

असे मानले जात आहे की एकाच कुटुंबातील दोन महिला, ज्या वेगवेगळ्या फर्ममधून आहेत, या लिलावात बोली लावत होत्या. कुटुंबातील परस्परविरोधी लढाईमुळे, बोलीची रक्कम वाढतच गेली आणि शेवटी 72 लाख किमतीच्या मद्याच्या दुकानाचा 510 कोटींमध्ये लिलाव झाला. मागच्यावेळी हे दुकान 65 लाखात विकले गेले होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजता या ऑनलाईन लिलावाला सुरुवात झाली होती जी प्रक्रिया रात्री 2 वाजेपर्यंत चालली.

दरम्यान, वसुंधरा राजे सरकारच्या काळात लिलाव यंत्रणा बंद करण्यात आली आणि लॉटरी पद्धत सुरु झाली. मात्र आता गहलोत सरकारने पुन्हा लिलाव यंत्रणा सुरू केली आहे. या प्रणालीमुळे राज्य सरकारला मोठा फायदा होत आहे. दैनिक भास्करच्या अहवालानुसार शुक्रवारी 5 मार्च रोजी 1140 दुकानांचा लिलाव झाला होता, त्यामध्ये 1721 कोटींची बोली लावण्यात आली होती. 9 आणि 10 मार्च रोजी या लिलावाचे दोन टप्पे पूर्ण होतील.