Rajasthan: प्रसादामधून भांगेची गोळी खायला देऊन करत असे बलात्कार; 4 महिलांवर अत्याचार करणाऱ्या Tapaswi Baba ला अटक
Representational Image (Photo Credits: Pixabay)

आसाराम, फलाहारी बाबानंतर आता राजस्थानच्या (Rajasthan) ‘तपस्वी बाबा’चेही (Tapaswi Baba) नाव दुष्कृत्य करणाऱ्या बाबांच्या यादीत जोडले गेले आहे. आपण स्वतः देव असल्याचा दावा करणाऱ्या तपस्वी बाबाला बलात्काराच्या (Rape) प्रकरणात जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. चार पिडीतांनी बाबाविरुद्ध बलात्काराचा आरोप केला होता. महिलांनी सांगितले की, बाबा प्रसादाच्या रूपाने भांगेची गोळी खायला देत असे व नंतर बलात्कार करत असत. बाबावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र, भांकरोटा पोलिसांनी पीडितांची वैद्यकीय तपासणी व त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी बाबाला अटक केली आहे.

या बाबाचे नाव तपस्वी बाबा उर्फ योगेंद्र मेहता (Yogendra Mehta) असे आहे. या बाबाने एकाच कुटुंबातील तीन महिलांवर बलात्कार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी भांकरोटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मंगळवारी या बाबाला अटक केली गेली. बाबा प्रसादामधून महिलांना भांगेची गोळी खायला देत असे. त्यानंतर पीडितांच्या नशेचा फायदा घेत त्यांच्यावर बलात्कार करत असे. जेव्हा महिला भांगेची गोळी खायच्या तेव्हा तो त्यांना स्वतःला मला समर्पित करा असे सांगत असे. एवढेच नाही तर बाहेर ही गोष्ट सांगितल्यास त्यांना जिवे मारण्याचीही धमकी देत असे. (हेही वाचा: Mumbai Rape: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला अटक, मुंबईच्या अंधेरी येथील धक्कादायक घटना)

पीडित महिलेने सांगितले की, तिचे लग्न जयपूरमधील बिंदायका इंडस्ट्रियल एरियामध्ये 1998 मध्ये झाले होते. तिच्या सासरकडची कुलदेवता तपस्वी बाबा होते. बाबांचा आश्रम मुकुंदपुरा येथे आहे. त्यांचे कुटुंब 25 वर्षांपासून बाबांच्या आश्रमात येत आहे. हळू हळू योगेंद्र मेहताने बाबांची गादी ताब्यात घेतली आणि तपस्वी बाबांचा आश्रम उघडला. योगेंद्र मेहता याचा आश्रम मुकुंदपुराखेरीज रातल्या सीकर रोड आणि दिल्ली रोड येथे आहे. पतीच्या आग्रहावरून ही महिला आश्रमात आली होती. 6 महिन्यातून एकदा हे कुटुंब आश्रमात येत असे व तिथे 3-4 दिवस राहून सेवा करीत असे.

एकदा बाबाने पिडीतेला आपल्या खोलीत बोलावले व तिला भांगयुक्त प्रसाद खायला दिला. त्यानंतर तिला नशा चढल्यावर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर 6 महिन्यांनीही असेच कृत्य घडले. मात्र अखेर ही गोष्ट बाहेर आलीच. त्यावेळी घरातील इतर महिलांवरही बलात्कार झाल्याचे समोर आले. अखेर मंगळवारी या बाबाला अटक केली गेली.