MiG-27 ला भारतीय वायुसेनेकडून अलविदा; जोधपूर एअरबेसवरून शेवटचं उड्डाण (Watch Video)
Image used for representational purpose. (Photo Credit: PTI)

कारगिल युद्धामध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या 'मिग 27'हे लढाऊ विमान आज निवृत्त झालं आहे. दरम्यान आह कारगिल मोहिमेमधील काही जवानांच्या उपस्थितीमध्ये राजस्थानातील जोधपूर हवाईतळावरून आज मिग विमानाची शेवटची फेरी झाली. कारगिल युद्धामध्ये 'मिग' विमानाने केलेल्या कामगिरीमुळे या विमानाला 'बहाद्दूर' असं नाव देण्यात आलं होतं. दरम्यान भारत हा मिग 27 ला अलविदा म्हणणारा शेवटचा देश आहे. भारताप्रमाणेच हे विमान श्रीलंका, युक्रेन, रशिया या देशांकडेही होते.

'मिग' विमानं ही मूळची रशियन बनावटीची आहेत. यामध्ये मिग 23 आणि मिग 27 ही विमानं जमिनीवरून शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी वापरलं जात असे. काही वर्षांपूर्वी मिग 23 निवृत्त झाले आता मिग 27 देखील निवृत्त करण्यात आलं आहे. 1999 साली झालेल्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या कारगिल युद्धात हिमालयात डोंगररांगांवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला करून भारताला विजय मिळवून देण्यामध्ये मिग 27 या विमानाने विशेष कामगिरी बजावली आहे.

मिग 27 ला अलविदा 

मिग विमानाची लांबी 17.8 मीटर, उंची 7.78 मीटर असते. तर विमानाचं वजन 11,908 किलो असतं. तर या मिग विमानातून 4000 किलो वजनाची हत्यारं घेऊन जाऊ शकतात. तर त्याचा वेग 1885 किमी प्रति तास इतका असतो. मिग या विमानाची जागा भारतीय बनावटीचं 'तेजस' आणि सुखोई 30 विमान घेण्याची शक्यता आहे.