राज ठाकरे: एक म्हणतोय की 10 रुपयात जेवण देऊ तर दुसरा म्हणतोय 5 रुपयात, महाराष्ट्राला काय भीक लागली का?
Raj thackeray (Photo Credit: IANS)

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या 5 दिवसांवर असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला जोर लावताना दिसत आहेत. राज ठाकरे यांनी आज नाशकात सभा घेतली व अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर टीका केली आहे.

एक सक्षम विरोधी पक्ष बनवा अशी मागणी त्यांनी मागील काही सभांप्रमाणे नाशिककरांकडे देखील

केली. पण त्याचसोबत अनेक अडचणींवर नाशिककरांची लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, "ह्यापुढे लोकांना अडवून, रस्ते अडवून, ट्रॅफिक होईल असं काहीही करून, थोडक्यात जेणेकरून लोकांना त्रास होईल असं माझं स्वागत ह्या पुढे करू नका."

शिवसेना व भाजप पक्षावर टीका करत ते म्हणाले, "शिवसेना भाजप ताटवाट्या घेऊन फिरतात, एक म्हणतोय की १० रुपयात जेवण देऊ तर दुसरा म्हणतोय की ५ रुपयात जेवण देऊ. महाराष्ट्राला काय भीक लागल्ये का?".

हिंदुस्थान एरॉनटिक्स लिमिटेड कंपनीच्या मुद्यावरही त्यांनी आपल्या भाषणातून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणले, "हिंदुस्थान एरॉनटिक्स लिमिटेड, जिथे देशाची विमानं बनतात तिथला कामगार रडतोय कारण त्यांचा पगार होत नाहीये. हा कामगार देशोधडीला लागायची वेळ आली आहे तरी सगळे थंड. लोकंच जर थंड राहणार असतील तर आम्ही निवडणुका लढण्याला आणि उमेदवार उभं करण्याला अर्थ आहे."