पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात झालेल्या पोर्शे गाडीच्या अपघातावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर आणि पोलीस विभागावर टीका केली आहे. पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी (19 मे) पहाटे नंबरप्लेट नसलेल्या एका आलिशान कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं होतं.   हा आरोपी केवळ 17 वर्षाचा असल्याचे  पोलिसांनी सांगितले तसेच आरोपील पोलीस स्थानकात विशेष वागणूक मिळाली असा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका केली. (हेही वाचा - Pune Porsche Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांची नाराजी (Watch Video))

रविवारी दुपारी आरोपीला विशेष हॉलिडे कोर्टात हजरही करण्यात आलं. मात्र न्यायालयाने तो अल्पवयीन आहे म्हणून त्याचा जामीन मंजूर केला. तसेच त्याला अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहायला लावला. याशिवाय पोलिसांनी कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई केली नव्हती. दरम्यान, याप्रकरणी समाजमाध्यमं आणि लोकांकडून प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर गृह मंत्रालय आणि प्रशासन जागं झालं. पुणे पोलिसांनी अपघाताच्या तीन दिवसांनंतर अल्पवयीन आरोपीच्या वडिसांसह बार मालक  आणि मॅनेजरला अटक केली.

पाहा पोस्ट -

काँग्रेसने सोशल मिडीयावर खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे, बस चालक असो, ट्रकचालक, ओला, उबर, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालक असो, यांच्यापैकी कुठल्याही चालकाने चुकून एखादा अपघात केला, त्या अपघातात कोणाचा बळी गेला तर त्या चालकाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. त्यांच्या वाहनाची चावी घेऊन ती फेकून दिली जाते. परंतु, त्यांच्याजागी एखादा श्रीमंतांच्या घरातला 17 वर्षांचा मुलगा असेल, जो दारू पिऊन पोर्शसारख्या कंपनीची महागडी कार चालवत असेल आणि त्याने एखादा अपघात केला, त्यात दोन जणांची हत्या केली तर त्याला काय शिक्षा होते? त्याला केवळ निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाते.