Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर कृषी कायद्यावरुन जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कृषी कायदे (Farm Laws) केंद्र सरकारने मागे घ्यावेत असे अवाहन करतानाच देशातील लोकशाही संपुष्टात आली असून केवळ कागदोपत्री लोकशाही अस्तित्वात असल्याची गंभीर टीका राहुल गांधी यांनी केली आहे. याच वेळी जे लोक केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात बोलतात त्यांना देशविरोधी किंवा दहशतवादी ठरवले जाते, असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले. राहुल गांधी आणि गुलाम नबी आझाद, अधीर रंजन चौधरी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकारने संमत केलेला कृषी कायदा हा शेतकरी विरोधातील आहे. त्यामुळेच अवघा देश केंद्र सरकारच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांची भूमिका अवघ्या देशाने पाहिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा, असे अवाहन आपण राष्ट्रपती कोविंद यांना केल्याचे राहुल गांधी यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Congress Against Farm Law: शेतकरी कायद्याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा; दिल्ली पोलिसांनी नाकारली परवानगी, कलम 144 लागू)

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, सरकार हे देशातील जनतेसाठी नव्हे तर निवडक उद्योगपतींसाठी काम करते आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने अशा प्रकारचे कृषी कायदे अस्तित्वात आणले. केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही. कोरोना व्हायरस भारताला मोठे नुकसान पोहोचवू शकतो, असा इशारा आम्ही आगोदरच दिला होता. परंतू, केंद्र सरकारने काहीच पावले उचलली नाहीत. आताही जर केंद्र सरकारने गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत तर देशाला आणखी मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, चीनने भारताची जमीन बळकवली आहे. परंतू, चीनप्रश्नी पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. या विषयावर ते सोईस्कर मौन बाळगून असतात असेही ते म्हणाले.