Rahul Gandhi On Farmers' Protest: आक्रमक शेतकरी आंदोलकांना राहुल गांधी यांचा सल्ला, ट्विट करत म्हटले 'हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही'
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे (Farm Laws 2020) मागे घ्यावे यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (Farmers Protest) करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज काढलेल्या ट्रॅक्टर रॅली भरकटली. यात काही आक्रमक आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला. आता विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनीसुद्धा ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत असे अवाहन करतानाच हिंसा हे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही, असे राहुल गांधी (Rahul Gandhi On Farmers' Protest) यांनी म्हटले आहे.

टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर दिल्ली पोलिसांनी लावलेले बॅरीकेट्स तोडून आंदोलक पुढे निघाले. ते थेट लाल किल्ल्यावर पोहोचले. लाल किल्ल्यात पोहोचलेल्या काही शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यावरच झेंडा फडकवला. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, . केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच, हिंसा हे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही, असा सल्लाही राहुल गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिला आहे. भलेही जखम कोणालाही होवो. नुकसान तर आपल्याच देशाचे होणार, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Kisan Tractor Rally: दिल्लीत आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यावर पोहचून रोवला आपला झेंडा!)

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हिंसा हे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. भलेही जखम कोणालाही होवो. नुकसान तर आपल्याच देशाचे होणार. शेतकऱ्यांनी आयटीओ आणि त्यानंतर लालकिल्ल्यावर प्रवेश केला. शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यात प्रवश केल्यावर गदारोळ माजला. दिल्ली आगोदर म्हटले होते की, दिल्लीच्या सर्व सीमा बंद आहेत. परंतू, काही वेळातच शेतकरी आंदोलन नियंत्रणाबाहेर गेले.दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाजीपूर बॉर्डरजवळ शेतकऱ्यांनी बॅरीकेट्स तोडले. दुसऱ्या बाजूला अक्षरधाम नोएडा मोड परिसरात शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. काही ठिकाणी किरकोळ हिंसेच्या घटनाही घडल्या. या वेळी काही ट्रक आणि गाड्यांचेही नुकसान झाले.

दिल्लीच्या सिमेवर देशभरातील प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी गेले 2 महिने आंदोलन करत आहेत. आंदोलन आणि कृषी कायद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात 12 वेळा चर्चा झाली. परंतू, सर्वच्या सर्व चर्चेच्या फेऱ्या अयशस्वी झाल्या. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढण्याचा निर्णय घेतला.