Rahul Gandhi Flying Kiss to BJP MPs: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस केल्याचा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे. ही घटना राहुल गांधी संसदेतून बाहेर पडताना घडल्याचे समजते. मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरुन विरोधकांच्या INDIA आघाडीने आणलेल्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर भाषण केल्यानंतर राहुल गांधी लोकसभा सभागृहातून बाहेर पडत होते. या वेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इरानी यांचे भाषण सुरु होते. दरम्यान, राहुल गांधी यांच्या हातातून काही फाईल्स खाली पडल्या. त्यावर भाजप नेते हसू लागले तेव्हा त्यांनी फ्लाईंग किस केला असे काहींचे म्हणने आहे.
स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात या घटनेचा उल्लेख करत म्हटले की, "फक्त एक दुराग्रही पुरुषच संसदेत महिला खासदारांना फ्लाइंग किस देऊ शकतो. असे उदाहरण यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते. महिलांविषयी ते काय विचार करतात हे यावरून दिसून येते. ही कृती अत्यंत अश्लील आहे", असेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा, Rahul Gandhi: मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या, राहुल गांधी आक्रमक)
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार शोभा करंदलाजे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, राहुल गांधी सर्व महिला सदस्यांना फ्लाइंग किस देऊन निघून गेले. एका सदस्याचे हे अयोग्य आणि असभ्य वर्तन आहे. भारताच्या संसदेच्या इतिहासात असे कधीच घडले नाही. तो कोणत्या प्रकारचा नेता आहे?म्हणूनच त्याचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची तक्रार आम्ही सभापतींकडे केली आहे. कारवाईच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत.
ट्विट
#WATCH | Union Minister and BJP MP Shobha Karandlaje says, "By giving a flying kiss to all women members, Rahul Gandhi went away. This is a total misbehaviour of a Member. This is inappropriate and indecent behaviour of a Member. Senior members are telling that this has never… https://t.co/IudK9YS0zw pic.twitter.com/yuD3qts7zc
— ANI (@ANI) August 9, 2023
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरु पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि म्हटले की सरकारने ईशान्य भारताचे दोन भाग केले. मी स्वत: हिंसाचारग्रस्त राज्याला भेटून आलो. पण पंतप्रधानांना या राज्याला भेटण्याची एकदाही इच्छा झाली नाही. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी लोक देशप्रेमी नव्हे तर देशद्रोही आहेत. मणिपूरची हत्या पंतप्रधान नव्हे तर त्यांच्या अहंकारामुळे झाल्याचेही ते म्हणाले.