काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात (Gujrat High Court) सुनावणी होणार आहे. सुरत सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल यांना दोषी ठरवण्याला स्थगिती देण्यास नकार दर्शवला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka) मागील लोकसभा निवडणुकीतील (2019) प्रचारावेळी राहुल यांनी मोदी आडनावाविषयी (Modi Surname) टिप्पणी केली. त्याबद्दल गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती.
दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गीता गोपी यांनी राहुल गांधी यांची केस ऐकण्यास नकार दिला. राहुल गांधी यांची केस दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग केली जाणार आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळं आज गुजरात उच्च न्यायालयच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वत: एक निष्णात वकील आहेत. तेच याबाबतच्या कायदेशीर बाबी हाताळत आहेत.