Qatar Frees Indian Navy Veterans: कतारच्या तुरुंगात असलेल्या 8 भारतीय माजी नौदल जवानांची सुटका, 7 जण मायदेशी परतले, कथित हेरगिरी प्रकरण
Qatar frees Indian Navy Veterans | (Photo Credits: ANI)

आंतरराष्ट्रीय पातळीवर कतारसोबतच्या राजनैतिक वाटाघाटीत भारताला (Qatar vs India on Navy Espionage Charges) मोठे यश आले आहे. कथीत हेरगिरी प्रकरणात आखाती देश असलेल्या कतारमध्ये अटकेत असलेल्या आठ भारतीय माजी नौदल कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) याबाबत सोमवारी (12 फेब्रुवारी) सकाळी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये कतार सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अल दाहरा ग्लोबल कंपनी या खाजगी कंपनीसाठी काम करणारे आठ माजी भारतीय नौदलातील सात जण कतारहून भारतात परतले.

आठपैकी सात जण भारतात परतले

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, "कतारमध्ये अटकेत असलेल्या दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. या आठपैकी सात जण भारतात परतले आहेत. या नागरिकांची सुटका आणि घरी परतणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी आम्ही कतार सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आठ भारतीयांना डिसेंबर 2023 मध्ये फाशीची शिक्षा रद्द केली होती. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय नौदल माजी कर्मचाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द केली होती. ही शिक्षा रद्द करुन ती तुरुंगवासात परावर्तीत करण्यात आली होती. (हेही वाचा, Indian Ex Navy Officers Death Penalty: भारतासाठी दिलासादायक बातमी! कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची याचिका मान्य)

कतारमध्ये अटक झालेल्या भातीय नौदल अधिकाऱ्यांची नावे

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश. (हेही वाचा, MEA Jaishankar On Qatar- Indian Detainees: परराष्ट्र मंत्री एस शंकर यांनी घेतली कतार मध्ये अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

आठपैकी सात जण भारतात परतल्यानंतर त्यांनी कतार प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केल्यबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. "पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाशिवाय आम्हाला येथे उभे राहणे शक्य झाले नसते. आणि भारत सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे घडले," असे नौदलातील एका अधिकाऱ्याने सांगितले. अटकेतून सुटका झालेल्या आणकी एका अधिकाऱ्याने म्हटले की, "आम्ही भारतात परत येण्यासाठी जवळजवळ 18 महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधानांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय आणि कतारशी त्यांचे समीकरण हे शक्य झाले नसते."

व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

अल दाहरासोबत काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना ऑगस्ट 2022 मध्ये हेरगिरीच्या कथित प्रकरणात अटक करण्यात आली होती. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप होता. मात्र, या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता कतारी अधिकाऱ्यांनी किंवा नवी दिल्ली या दोघांनीही भारतीय नागरिकांवरील आरोप सार्वजनिक केले नाहीत. 26 ऑक्टोबर 2023 रोजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्सने फाशीची शिक्षा सुनावली. भारताकडून या निर्णयाचे वर्णन "खूपच" धक्कादायक असे करण्यात आले होते. या निर्णयाबाबत आपण कतार सरकारकडे दाद मागू असेही भरत सरकारने म्हटले होते. या प्रकरणाला आपण सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. या प्रकरणात कायदेशीर पर्यायांचा आम्ही विचार करु असेही भारत सरकारने म्हटले होते.