Punjab Municipal Poll Results : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाचा भाजपला धक्का; स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस अधिक घट्ट
Congress | ( (Photo Credits: @capt_amarinder/Twitter)

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) भाजपला (BJP) पंजाबमध्ये जोरदार फटका बसला आहे. पंजाब राज्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2021 (Local Body Elections in Punjab 2021) मध्ये काँग्रेस (Congress ) पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजपचा सुफडा साफ झाला आहे. भाजपसोबत शिरोमणी अकाली दल पक्षालाही जोरदार झटका बसला आहे. एकूण 7 महापालिकांपैकी (Punjab Municipal Poll Results) सर्व ठिकाणी काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तर भाजपला एकाही महापालिकेत सत्ता मिळवता आली नाही.

पंजाबमध्ये सुमारे 109 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी या दिवशी 109 नगपालिका, नगर पंचायत आणि सात महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी आज पार पडत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस पक्षाने सर्वच्या सर्व सात महापालिकांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला यापैकी एकाही महापालिकेवर विजय मिळवता आला नाही.

काँग्रेसने जिंकलेल्या महापालिका

  • मोगा
  • होशियारपुर
  • कपूरथला
  • अबोहर
  • पठानकोट
  • बटाला
  • बठिंडा (तब्बल 53 वर्षानंतर काँग्रेस प्रथमच विजयी)

महत्त्वाचे असे की बठिंडा लोकसभा मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरतकौर बादल या खासदार आहेत. केंद्र सरकारमध्ये त्या कृषीमंत्री होत्या. मात्र केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केल्यांतर हरसिमरतकौर बादल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच शिरोमणी एनडीएमधून शिरोमणणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण 9222 उमेदवार मैदानात होते. निवडणुकीत सर्वात अधिक 2,831 उमेदवार हे अपक्ष होते. तर काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 2037 उमेदवार उभे केले होते. भाजपने केवळ 1003 उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या वेळी भाजपने शिरोमणी अकाली दल या मित्रपक्षाशिवाय आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. शिरोमणी अकाली दलाने 1569 उमेदवार मैदानात उतरवले होते.