Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

पंजाब (Punjab) मध्ये आज 117 विधानसभा जागांवर मतदान एकाच टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. या निवडणूकीमध्ये अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण देखील रिंगणात उतरली आहे. मतदानावेळेस एका निवडणूक ऑब्जर्वरने लंडेके गावात जाताना सोनू सुदला रस्त्यामध्ये अडवले आहे. त्याची गाडी जप्त करण्यात आली आणि दुसर्‍या गाडीने त्याला घरी पाठवण्यात आले. सध्या सोनू सूदला घरीच राहण्याचे आदेश आहेत. या कारवाईमुळे अन्य उमेदवारांमध्येही खळबळ पसरली आहे.

अकाली दलाचे पोलिंग एजंट दीदार सिंह यांनी निवडणूक आयोगाला तक्रार करत सोनू सूद मतदारांना प्रभावित करत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर सोनू सूदचा पाठलाग करत त्याला रोखून घरी पाठवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सोनू सूद आपल्या बहिणीसाठी प्रचार करतानाही दिसला आहे.

सोनू सूदची खाजगी गाडी सिटी वन पोलिस ठाण्यात उभी करण्यात आली आहे. सोनू सुदने मात्र त्याच्यावरील आरोप फेटाळले आहेत. 'आपण मतदारांना प्रभावित करत नव्हतो तर समर्थकांकडून रिपोर्ट घेत असल्याचं' अभिनेत्याचं मत आहे. सोनू सुदची बहीण मालविका सूद निवडणूकीच्या रिंगणात आहे. मालविका मोगा विधानसभा क्षेत्रातून कॉंग़्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढत आहे. भाजपा उमेदवार हरजोत कमल विरुद्ध तिची लढत आहे.

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, 'आम्हाला धमकीचे फोन कॉल्स येत आहेत. यामध्ये अनेक विरोधकांचा प्रामुख्याने अकाली दलचा समावेश आहे. काही बुथवर पैसे वाटप झाले आहे त्यामुळे आता निवडणूक पारदर्शक सुरू आहेत का? हे पाहणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी बाहेर पडलेले असताना पुन्हा घरी पाठवले आहे' असे सोनू म्हणाला.