Representative Image (File Image)

पुण्यामध्ये दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर सदाशिव पेठेमध्ये कोयता हल्ला प्रकरण यामुळे आता अल्पवयीय तरूणांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पुणे पोलिस अ‍ॅक्शन मोड मध्ये आले आहे. गुन्हेगारांवर चाप लावण्यासोबत पुणे पोलिस आयुक्तांनी कर्मचार्‍यांवरही कारवाईचा आसूड ओढला आहे. पुन्हा एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 पोलिस कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आलं आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षकांच्या निलंबनानंतर आता वारजे पोलीस ठाण्याच्या निरीक्षकालाही निलंबित करण्यात आले आहे.

कामामधील हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना पुणे पोलिस आयुक्तांनी दणका दिला आहे. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलीस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलीस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, पोलीस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलीस नाईक सचिन संभाजी कुदळे यांचे निलंबन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Sadashiv Peth Pune Horror: सदाशिव पेठेतील त्या थरारक घटनेनंतर पुणे आयुक्तांनी 3 कर्मचार्‍यांचे केले निलंबन; दामिनी पथक, बीट मार्शल मध्ये वाढ .

पोलिसांनी योग्यरित्या मोक्का कारवाई केली नाही, परिसरातील दारुची दुकानं बंद न केल्याने, अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींविरोधात कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखवल्याचं कारण देत त्यांनी ही कारवाई केली आहे.

सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यानंतर पेरुगेट पोलीस चौकीतही एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हता. त्यावरूनही पुणेकरांनी नाराजी बोलून दाखवली. तेव्हाही पुणे आयुक्तांनी कारवाई करत काहींचे निलंबन केले होते.