पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये (Sadashiv Peth) काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या तरूणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न संतापजनक आहे. या घटनेमध्ये रस्त्यावरून जाणारा एक मुलगा तिच्यासाठी देवदूत ठरला पण पुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का? कायद्याचा धाक नाही का? असे प्रश्न आता उभे राहत आहे. दरम्यान सदाशिव पेठेत पेरूगेट पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली होती आणि संतापजनक बाब म्हणजे हा प्रकार घडला तेव्हा पोलिस चौकी बंद होती. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी कारवाई करत 3 कर्मचार्यांचे निलंबन केले आहे.
निलंबित पोलिसांची नावं हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे आहेत. या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी आरोपी शंतनू जाधवला अटक केली आहे. पेरूगेट पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना, चौकीतील हे तीन पोलीस कर्मचारी कामाच्या ठिकाणावर पोलिस उपस्थित नव्हते. नक्की वाचा: Leshpal Javalge Insta Story: पुण्याच्या सदाशिव पेठेत तरूणीचा जीव वाचवणार्या लेशपाल जवळगे याला युजर्स चे DM वर संतापजनक प्रश्न; स्टोरी शेअर करत म्हणाला...!
सदाशिव पेठेतील या घटनेनंतर पुणे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, महिला पोलिसांची 25 दामिनी पथकं तयार करण्यात येणार असून ही पथकं रोज शहरात गस्त घालणार आहेत. पेट्रोलिंगसाठी आणखी 100 बीट मार्शल नियुक्त करण्यात येणार आहेत. पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकी 24 तास सुरु ठेवली जाणार आहे.
पुण्यात राजगडाजवळ दर्शना पवार या एमपीएससी च्या परीक्षेत तिसर्या आलेल्या मृलीचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असताना अवघ्या 21 वर्षीय मुलाने मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न चिंता वाढवणारा आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दोन तरूणांच्या प्रसंगावधानतेमुळे मुलीचा जीव वाचला आहे. या थरारक घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडीयात सर्वत्र वायरल झालं आहे.