
Student Dies by Suicide: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रतापगड जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. यूपी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसू न शकल्यामुळे निराश झालेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. परीक्षा शुल्क न भरल्याने शाळा प्रशासनाने त्याला प्रवेशपत्र दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना प्रतापगड जिल्ह्यातील जेतवारा पोलीस स्टेशन परिसरातील धनसारी गावात असलेल्या साधुरी शिरोमणी इंटर कॉलेजमधील आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव शिवम सिंग असे आहे, तो परिसरातील आखोन गावचा रहिवासी होता. आर्थिक अडचणींमुळे तो 5 हजार रुपये शाळेची फी भरू शकला नाही, ज्यामुळे त्याला वारंवार प्रवेश नाकारण्यात आला.
शिवम गेल्या एका आठवड्यापासून प्रवेशपत्रासाठी शाळेत येत होता. रविवारी तो दोन हजार रुपये घेऊन शाळेत पोहोचला तेव्हा मुख्याध्यापकांनी त्याचा अपमान केला आणि त्याला हाकलून लावले. परीक्षेत बसण्याची त्याची शेवटची आशाही धुळीस मिळाल्यानंतर, शिवमने रात्री घरामागील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. (हेही वाचा - Couple Dies By Suicide In Front Of Train At Vikhroli Station: कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; विक्रोळी स्टेशनवर ट्रेनसमोर उडी मारून मारून जोडप्याने संपवली जीवनयात्रा)
मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची -
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, शिवमची बहीण गेल्या चार महिन्यांपासून आजारी होती, ज्यामुळे कुटुंब आधीच आर्थिक अडचणींना तोंड देत होते. या कारणास्तव तो त्याची संपूर्ण फी जमा करू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (पश्चिम) संजय राय यांनी सांगितले की, कुटुंबाच्या तक्रारीवरून शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिवमच्या आजोबाने सांगितले की, फी भरता न येण्याची परिस्थिती समजून घेण्याऐवजी शाळा प्रशासनाने शिवमचा अपमान केला ज्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. कुटुंबीयांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.