Prime Minister Narendra Modi (ANI Photo)

भारत कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाच्या बाबतीत सध्या जगात 4 थ्या क्रमांकावर आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखाच्या उंबरठ्यावर आहे. अशात 16 आणि 17 जून रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. कोरोना विषाणू संकटाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेतचा हा त्यांचा 6 वा संवाद आहे. यावेळी ते कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेतील. तसेच यावेळी अनलॉक -1 च्या स्थितीचे पुनरावलोकन देखील होऊ शकते. असे सांगितले जात आहे की, या बैठकीमध्ये कोरोना विषाणूला रोखण्यासाठी केंद्र सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जून रोजी, 21 राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये, पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल, चंडीगड, गोवा, मणिपूर, नागालँड, लडाख, पुडुचेरी, अरुणाचल, मेघालय, मिझोरम, ए अँड एन बेटे, दादर नगर हवेली आणि दामण दीव, सिक्किम आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे. याठिकाणी कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची कमी आहे. त्यानंतर पंतप्रधान 17 जून रोजी 15 राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील, यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांच्या समावेश आहे. याठिकाणी देशातील सर्वात जास्त कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून धार्मिक स्थळ, मॉल्स, हॉटेल, ऑफिस संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी)

दोन्ही दिवशी दुपारी 3 वाजता हा संवाद सुरु होणार आहे. यापूर्वी 29 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत, कोरोना संक्रमणाविरोधात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊन विषयी बैठक घेतली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये आराम मिळवण्यासाठी 'अनलॉक' सुरू करण्यात आले.