केदारनाथाचे दर्शन करताना नरेंद्र मोदी (Photo Credit-ANI)

डेहारादून येथे पोहचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथाचे दर्शन घेतले. हेलीपॅडवर उतरल्यानंतर सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता पायी पार करत पंतप्रधान मोदी केदारनाथ मंदिरात पोहचले. तिथे मोदींनी केदारनाथाला जलाभिषेक केला, पूजा केली आणि त्याच्या चरणी नतमस्तक झाले.

पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची सरकार गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होतं. यासाठी व्हिआयपी हेलीपॅडपासून ते केदारनाथ मंदिरापर्यंतच्या मार्गावरील बर्फ हटवण्यात आला होता. केदारनाथाच्या दर्शनानंतर मोदी हर्षिल बॉर्डरवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करतील.

कॅबिनेट मंत्री प्रकाश पंत, धनसिंग रावत, भाजपा प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट आणि आचार्य बालकिशन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. तसंच भक्तांच्या सुरक्षिततेसाठी मोदी परिक्रमेसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गाची तपासणी करतील.

काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यात त्यांनी लिहिले की, "दिवाळी लोकांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो."