मोबाईल नंबर लिंक करुन स्वस्त दरात विकला कांदा, प्रति यूजर दोन किलोपेक्षा अधिक मिळणार नाही
Onion | (Photo Credits: PixaBay)

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे जर कोठे स्वस्त दरात कांदा उपलब्ध होत असेल तर लोकांची झुंबड उडाली नाही तरच नवल. बिहार (Bihar) राज्यातही असेच झाले बिहारची राजधानी पटना (Patna) येथे केवळ 35 रुपये प्रतिकिलो या दराने कांदा (Onion) विकला गेला. विशेष म्हणजे अशा पद्धतीने कांद्याची विक्री करण्यासाठी मोबाईल क्रमांकाच वापर करण्यात आला. ग्राहकांना कांदा विक्री करताना मोबाईल नंबर लिंक करण्यात आला. तसेच, नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच कांदा विकण्यात आला. नोंदणी केलेल्या प्रति यूजर जास्तीत जास्त केवळ दोन किलो कांदा खरेदी करु शकतो अशी मर्यादाही ठेवण्यात आली होती.

ब‍िस्‍कोमान (बिहार स्टेट कॉपरेटिव मार्केटिंग यूनियन लिमिटेड) ने ही कांदा विक्री केली. बिस्कोमान ने ग्राहकांना मोबाईलद्वारे नोंदणी करण्यास सांगितले. नोंदणीकृत ग्राहकांना एकएक कूपन देण्यात आले. एक व्यक्ती दोन वेळा कूपन घेऊ शकत नाही अशी अटही ठेवली. बिस्कोमानने नाफेडच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला. बिस्कोमान अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या उपक्रमासाठी राजस्थान राज्यातून कांदा मागविण्यात आला होता. या कांद्याची किंमत प्रतिकिलो 60 रुपये होते. मात्र, हा कांदा जनतेसाठी प्रतिकिलो 35 रुपये दराने विकला गेला. (हेही वाचा, नाशिक येथे 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला, उत्पादकाकडून पोलिसात तक्रार दाखल)

गेल्या काही काळापासून देशभरात कांद्याच्या किमती गगनाला भिडत आहे. सर्वासामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर या किमती जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे कांद्याचे दर कमी व्हावेत अशी आपेक्षा लोक वारंवर करत आहे. त्यामुळे जर अशा प्रकारे जर उपक्रम राबवले आणि नागरिकांना कमी दरात कांदा मिळू लागला तर लोकांनाही त्याचा फायदा होईल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.