मोबाईल हे हाताच्या पकडीत मावणारं पण जगाची माहिती ठेवणारं उपकरण अलीकडे खाता पिता प्रत्येकाच्या हाताला जणू काही चिकटूनच राहिलेलं असतं, काही जण तर या मोबाईल साठी इतके वेडे असतात की क्षणभरही त्यांना फोन डोळ्यासमोरून दूर झालेला चालत नाही, इतकंच काय तर त्यांच्या फोनसोबत कोणी मस्ती केली तर ही मंडळी अक्षरशः हिंसा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना एकाअर्थी या फोनचं व्यसनच (Mobile Addiction) लागलयं असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही, फोनमुळे आजवर झालेल्या हिंसक घटना लक्षात घेता प्रयागराज (Prayagraj) मधील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात (Motilal Nehru Hospital) मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात व्यक्तीचे मोबाईल आणि इंटरनेटचे वेड कमी करण्यासाठी उपचार केले जाणार आहेत. खास म्हणजे, रुग्णालयात पहिल्याच दिवशी 15 रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याचे सुद्धा समजत आहे. Pubg Addiction: पबजी गेम खेळण्याच्या नादात तरुण अॅसीड प्यायला; प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु)
रुग्णालयातील डॉ. राकेश पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची टिम यावर खूप दिवसांपासून काम करत होती. त्यानंतर हे केंद्र सुरू करण्यात आलं. पहिल्याच दिवशी आलेल्या रुग्णांना औषधासोबतच समुपदेशन करण्यात आले. रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे. केंद्रांमध्ये मुलांना लागलेले फोनचे आणि इंटरनेटचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. तर मानसोपचारतज्ञ ईशान्या राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलच्या अतिवापराने मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो, हे रोखण्यासाठी मोबाइल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उपचार केले जातात. तर आठवड्यातील इतर दिवशी डॉक्टरांची टीम विभागात जाऊन मोबाइलच्या व्यसनाची लोकांना माहिती देऊन त्यापासून सावध करत आहे.
दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाच्या माहितीनुसार, या केंद्राला मिळणार प्रतिसाद पाहून त्यानंतर अशा प्रकारच्या केंद्राची स्थापना देशभरात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत