'प्रज्ञा ठाकूर, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे'; विमानात भाजप खासदारावर भडकले प्रवासी, सुनावले खडे बोल (Video)
BJP MP Pragya Thakur (Photo Credits: IANS)

आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार, साध्वी प्रज्ञा ठाकूर (Pragya Singh Thakur) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांना फ्लाइटमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या रागाचा सामना करावा लागलेला दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक प्रवासी त्यांना चक्क 'तुम्हाला लाज वाटायला पाहिजे' असे वाक्य उच्चारताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा खासदार खासगी कंपनीच्या विमानातून दिल्लीहून भोपाळला येत होत्या तेव्हा ही घटना घडली आहे.

प्रज्ञा ठाकूरचा यांच्या विमानातील सीटबाबत कर्मचाऱ्यांशी वाद झाला आहे. ठाकूर या विमानातील आपत्कालीन जागेची मागणी करत विमानातच अडून बसल्या. या गोष्टीमुळे विमानाचे उड्डाण 45 मिनिटे लांबल्याने, इतर प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. यादरम्यान ठाकूर यांचे विमानातील प्रवाशांशीही खटके उडाले. 'तुम्ही जनेतेचे प्रतिनिधी आहात त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा लोकांचा विचार करायला हवा. असे वागायला लाज कशी वाटेत नाही' अशा शब्दांत इतर प्रवशांनी आपला राग व्यक्त केला. (हेही वाचा: Video: मारक शक्तींचा वापर केल्यामुळे भाजप नेत्यांचा मृत्यू: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर)

यावर प्रतिक्रिया देताना, 'या विमानात फर्स्ट क्लासची सीट नाही, माझ्या सुविधा नाहीत तरीही मी यातून प्रवास करत आहे, यामागे काही कारण असेल ना' असे ठाकूर म्हणाल्या. या घटने नंतर प्रज्ञा ठाकूर यांनी क्रूवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी याची विमानतळ संचालकांकडेही तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणादरम्यान, प्रवाशांनी भाजपच्या खासदारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांनी ठाकूर यांच्या त्यांच्या वागण्याचा निषेधही केला आहे.