वृत्तसंस्था न्यूजक्लिक (Newsclick Office) निधी संबंधीत चौकशी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police Raids) विविध पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले आहेत. ही कारवाई मंगळवारी (3 ऑक्टोबर 2023) रोजी करण्यात आली. भारती दंड संहितेतील विविध कलमांद्वारे 17 ऑगस्ट रोजी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. सदर गुन्हा भादंसंमधील बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायदा आणि कलम 153A (विविध समुदयांमध्ये तेड वाढविणे) आणि 120B (गुन्हेगारी कटाची शिक्षा) अन्वये दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये वेबसाइटचे संपादक प्रबीर पुरकायस्थ (Prabir Purkayastha), पत्रकार अभिसार शर्मा (Abhisar Sharma), अनिंद्यो चक्रवर्ती (Aunindyo Chakravarty), भाषा सिंग (Bhasha Singh) आणि व्यंगचित्रकार संजय राजौरा (Sanjay Rajaura) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल पत्रकार अभिसार शर्मा यांनी स्वत: 'X' पोस्टद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी छापेमारी केली असून माझा फोन आणि लॅपटॉप माझ्यापसून काढून घेतला आहे. भाषा सिंह यांनीही अशीच माहिती देत पोलिसांनी आपला फोन ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय राजौरा यांनी दिल्ली येथील लोधी कॉलनी पोलीस स्टेशन येथून 'स्क्रोल'शी बोलताना सांगितले की, काही प्रशासकीय अधिकारी घरी सकाळी 6.30 च्या दरम्यान आले. त्यांनी घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता आणि त्यांना बाजूला ढकलत पहिल्यांदा माझा फोन, लॅपटॉप आणि काही सीडी ताब्यात घेतल्या. त्यांचे वर्तन गुंडासारखे होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारे आम्हाला कायदेशीर कारवाई असल्याचे सांगितले नाही, कोणत्याही प्रकारचे वॉरंट दाखवले नाही. त्यांनी आमच्याबद्दलची वॉरंन्टची कॉपीही दाखवली नाही. त्यांनी फक्त इतकेच सांगितले की, आपण न्यूजक्लिक प्रकरणाशी संबंधित चौकशी करत आहोत.
एक्स पोस्ट
Delhi police landed at my home. Taking away my laptop and Phone...
— Abhisar Sharma (@abhisar_sharma) October 3, 2023
ट्विट
Finally last tweet from this phone. Delhi police seizure my phone.
— bhasha singh (@Bhashak) October 3, 2023
दरम्यान, दिल्लीतील न्यूजक्लिकच्या कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. ट्रायकॉन्टिनेंटल: इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिसर्च या थिंक टँकच्या संचालिका तिस्ता सेटलवाड यांच्यावर मुंबईतही अशीच कारवाई करण्यात आली होती. थिंक टँकने Newsclick संदर्भात अनेक लेख प्रकाशित केले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरू आहे.