Porn Video Addiction: पोर्न व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलाचा 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; नंतर केली निर्घुण हत्या
Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बेमेतरा (Bemetara) जिल्ह्यात पोर्न व्हिडिओचे (Porn Video) व्यसन असलेल्या एका अल्पवयीन मुलाने एका 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. पुरावे लपवण्यासाठी आरोपीने ही हत्या आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी मुलीचा मृतदेह खोलीत लटकवला. याप्रकरणी आरोपी मुलाला (17 वर्षे) अटक करण्यात आली आहे. घटना बेमेतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगपूर गावची आहे. शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी घराच्या खोलीत 10 वर्षीय मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनास्थळ पाहून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. प्रत्यक्षात मुलीची उंची सुमारे 4 फूट होती, तर व्हरांड्यात ज्या बांबूच्या झुल्यावर तिचा मृतदेह लटकला होता त्याची उंची 5 फूट 10 इंच इतकी होती. फासावर लटकलेल्या मुलीचे दोन्ही हात (हाताचे तळवे) उघडे होते. सहसा जेव्हा एखादी व्यक्ती फास घेते तेव्हा त्याच्या मुठी बंद होतात किंवा तळवे आत दुमडले जातात. अशा गोष्टी समोर आल्यानंतर पोलिसांनी ही एक हत्या असल्याचे समजून तपास सुरू केला.

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून एएसपी यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी पथक तयार करण्यात आले. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केल्यावर पोलिसांना एका अल्पवयीन मुलावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असल्याचे आरोपीने सांगितले. घटनेच्या दिवशीही त्याने एक अश्लील व्हिडिओ पाहिला होता, त्यानंतर छतावरून उडी मारून तो मुलीच्या घरात घुसला. तिथे त्याने मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले आणि नंतर तिची हत्या केली. आरोपीने सांगितले की, घटनेच्या वेळी मुलीच्या मामाची 1 वर्षाची मुलगीही घरात होती. (हेही वाचा: Delhi Crime: पतीची हत्या करून अवयवाचे केले तुकडे, पत्नीसह मुलगा अटकेत)

स्टेशनचे प्रभारी अंबर सिंह भारद्वाज यांनी सांगितले की, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी घरात फक्त 10 वर्षांची मुलगी आणि तिची एक वर्षाची मामेबहीण होती. हीच संधी साधून आरोपी मुलीच्या घरात घुसला. आरोपींविरुद्ध कलम 450, 376, 376AB, 302 आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. शॉर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून बलात्कार आणि हत्येची पुष्टी झाली आहे.