
भारतीय जनता पक्ष (BJP) दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (PM Narendra Modi’s Birthday) ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करतो. यावर्षी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींचा 73 वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा यांनी पक्षाच्या खासदारांना 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात 'सेवा पखवाडा' आयोजित करण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी सांगितले की, नड्डा यांनी खासदारांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली आणि सांगितले की, 'सेवा पखवाडा' 17 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर, महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरू राहील. या दरम्यान खासदारांना रक्तदान शिबिर आणि स्वच्छता मोहिमेसह त्यांच्या भागातील लोकांची सेवा करण्यास सांगण्यात आले आहे.
जर पात्र लोकांकडे आयुष्मान भारत योजनेची कार्डे नसतील तर त्यांना ती मिळविण्यात मदत करा, असेही खासदारांना सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांना 'मेरी माटी मेरा देश' मोहिमेद्वारे लोकांशी संवाद साधण्यास आणि गावांना भेट देण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या तयारीसंदर्भात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, विनोद तावडे, सुनील बन्सल, संजय बंदी आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा: Special Session of Parliament: केंद्र सरकार बोलावणार संसदेचे विशेष अधिवेशन, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती; कारण अद्यापही गुलदस्त्यात)
भाजप 25 सप्टेंबरला दीनदयाल उपाध्याय जयंती आणि 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री जयंती ‘सेवा पखवाड’ म्हणून साजरी करणार आहे. अशाप्रकारे पीएम मोदींचा वाढदिवस खास बनवण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. पक्षाने गेल्या वर्षीदेखील 17 सप्टेंबरपासून पंधरवडा ‘सेवा पखवाडा’ साजरा केला होता. पीएम मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला होता.