PM Narendra Modi 28 नोव्हेंबरला देणार पुण्याच्या Serum Institute Of India ला भेट; Covishield Vaccine चा घेणार आढावा
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

जगभर कोरोना वायरस संकटाचा (Coronavirus Pandemic) धुमाकूळ सुरू होऊन आता वर्ष लोटलं आहे. मात्र अद्याप कोविड 19 ला रोखण्यासाठी कोणतीही ठोस लस, उपचार पद्धती सुरू झालेली नाही. दरम्यान अशामध्ये आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटला (Serum Institute Of India) भेट देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या शनिवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर दिवशी येणार आहेत. पुण्याची सीरम इन्स्टिट्युट सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या (AstraZeneca) कोविड 19 वरील लसीच्या उत्पादनाची जबाबदारी सांभाळत आहे. सीरम इन्स्टिट्युट ही जगातील सर्वात मोठी लस निर्माण करणारी कंपनी आहे. त्यामुळे आता जगाचे लक्ष सीरम इन्सिट्युटकडे लागले आहे. सोबतच सीरम आता भारतामध्ये 'कोविशिल्ड'  (Covishield Vaccine) या लसीची देखील मानवी चाचणी घेत आहे. त्यामुळे भारतातील या लसीच्या मानवी चाचणीच्या निकालाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

सीरम च्या 'कोविशिल्ड' लसीच्या मानावी चाचणीला परवानगी दिल्यानंतर पहिल्यांदाच त्याच्या कंपनीला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी सीरम इंस्टिट्युटला भेट दिली होती. Oxford COVID-19 Vaccine सर्वसामान्यांसाठी एप्रिल 2021 पर्यंत 'या' किंमतीत उपलब्ध होईल; SII CEO अदर पुनावाला यांची माहिती.

दरम्यान पुण्याचे डिव्हिजनल कमिशनर सौरभ राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौरा आणि सीरम इंस्टिट्युटला भेट या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप 'मिनिट टू मिनिट' कार्यक्रम हाती आलेला नसल्याचं त्यांनी सांगितले आहे. असे PTI चे वृत्त आहे. सोबतच 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इंस्टिट्युटला भेट देतील असे सांगण्यात आले आहे.

भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन भारतीय बनावटीच्या कोविड 19 चा सामना करू शकतील अशा लसी अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात आहे. एप्रिल- मे 2021 पर्यंत या लसी हातामध्ये येतील, लसीकरण सुरू करता येईल असा सध्याचा अंदाज आहे. तर सीरम इन्स्टिट्युट कडूनही सरकारला लसीचे डोस 250 रूपयांमध्ये उपलब्ध करून दिले जातील असे अदार पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे.