PM Modi and Joe Biden Talk: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन संभाषण; 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
PM Modi & Joe Biden (Photo Credits: ANI/Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President-Elect Joe Biden) यांच्यासोबत मंगळवारी (17 नोव्हेंबर) फोनवरुन चर्चा केली. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मोदींनी जो बायडन यांचे अभिनंदन केले. तसंच त्यांनी कोविड-19 (Covid-19) आणि हवामानातील बदल (Climate Change) या मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचबरोबर  भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झाल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. आम्ही भारत-अमेरिका पार्टनरशिप दृढ करण्याबाबत बोललो. तसंच आम्ही कोविड-19 संकट, हवामानातील बदल आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्य याबद्दल जे आमचा प्राधान्यक्रम आणि चिंतेचे विषय आहेत, त्याबाबत चर्चा केली."

पुढच्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात, "मी उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचेही अभिनंदन केले. त्यांचे यश भारतीय-अमेरिकन संबंध दृढ करण्याचा एक मोठा स्त्रोत आहे. तसंच भारतीय-अमेरिकन समुदायातील सदस्यांसाठी ही एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट:

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जो बायडन यांच्या कारकिर्दीत भारत आणि अमेरिकेमधील संबंध आणखी वाढतील असा विश्वास व्यक्त केला होता. तसंच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी भारत आणि दोन्ही देशांचे संबंध हे विषय नवीन नाहीत, असेही ते म्हणाले होते. (US Protest against Presidential Election Results: अमेरिकेत डोनाल्ड ट्रंम्प यांना समर्थन, निवडणूकीच्या निकालाविरोधात हजारोंच्या संख्येने नागरिकांचे आंदोलन)

नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका 2020 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि कमला हॅरिस विजयी ठरले. या निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला.