PM Narendra Modi | (Photo Credits: YouTube)

सध्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. भाजप मोठ्या ताकदीने प्रचार करत आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi यांचा उत्साहही कमी झालेला नाही. पंतप्रधान मोदी सतत सभा आणि निवडणूक कार्यक्रम करत आहेत. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, त्यांनी गेल्या तीन दिवसांमध्ये 10 रॅली काढल्या आहेत. सध्या देशात कोरोना विषाणू (Coronavirus) चा उद्रेक होत असताना, भाजपच्या प्रचार अभियानाचे नेतृत्व करीत पीएम मोदी यांनी या निवडणूक हंगामात आतापर्यंत 23 रॅलीमध्ये सहभाग नोंदवला आहे.

सध्या पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांमध्ये मतदान प्रक्रियेचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. केरळ, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एप्रिल महिना सुरू होताच पंतप्रधान मोदींची निवडणूक दौड सुरू झाली. फक्त तीन दिवसांत पंतप्रधानांच्या मेळाव्याची संख्या 10 वर पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने पाचही राज्यात आपली उपस्थिती नोंदविली होती. अशाप्रकारे भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, तर आसाममध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

पीएम मोदी यांनी केरळ, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथेही सभांना संबोधित केले आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी आसाममधून तीन दिवसांचा आपला निवडणूक प्रवास सुरू केला. पहिल्या दिवशी आसाममधील कोकराझार, बंगालमधील जयनगर आणि उलुबेरिया येथे जाहीर सभा घेण्यात आल्या. त्यानंतर तामिळनाडूला पोचल्यानंतर त्यांनी मदुरैतील मीनाक्षी मंदिरात भेट दिली. दुसर्‍या दिवशी मदुरै, कन्याकुमारी, पाटणमथिट्टा, तिरुअनंतपुरम येथे रॅली निघाली. यानंतर तिसर्‍या दिवशी त्यांनी तमुलपूर, तारकेश्वर आणि सोनारपूर येथे जनतेला संबोधित केले. (हेही वाचा: Second Wave of COVID-19: भारतात एप्रिलच्या मध्यावर शिगेला पोहोचेल कोरोना विषाणूचा संसर्ग; शास्त्रज्ञांनी वर्तवला धक्कादायक अंदाज)

देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. याआधी केंद्राच्या एका सर्वेक्षणानुसार देशात 50 टक्केहून अधिक लोक मास्क घालत नसल्याचे आढळले होते. या पार्श्वभुमीवर पीएम मोदी यांनी या निवडणूक हंगामात तब्बल 23 रॅली काढण्याने ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे.