PM Modi Interview: पाच राज्यांमध्ये भाजपच जिंकेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा
Narendra Modi | | (Photo Credit : ANI)

विधानसभा निवडणूक (Assembly Election) सुरु असलेल्या पाच राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत (PM Modi Interview) ते बोलत होते. ते म्हणाले पाचही राज्यांमध्ये भाजपची लाट आहे. भाजप, काँग्रेस आणि इतर काही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीत भाष्य केले. उल्लेखनीय असे की, पाच राज्यांमध्ये विधनसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2022) मतदानाचा पहिला टप्पा पार पडण्यापूर्वी आणि त्यासाठी प्रचार संपण्यापूर्वी ही मुलाखत आली आहे. या मुलाखतीत पंतप्रधानांनी भाजपचा विचार हा 'सबका साथ सबका विश्वास' हाच असल्याचे सांगितले. तसेच, सत्तेत असो अथवा नसो, भाजप नेहमीच लोकहितासाठी काम करतो, असे मोदी म्हणाले.

पाचही राज्यांमध्ये भाजप प्रचंड बहुमताने विजयी होईल, असे सांगतानाच मोदी म्हणाले, मी सर्वच राज्यांमध्ये हवा भाजपच्या बाजूने असल्याचे पाहतो आहे. या राज्यातील नागरिक पुन्हा एकदा भाजपलाच जनसेवा करण्याची संधी देतील. कोणत्याही राज्यात भाजप विरोधी लाट दिसत नाही. त्यामुळे जनादेश हा भाजपलाच मिळेल. ज्या ठिकाणी भाजपला स्थिरता मिळाली आहे त्या ठिकाणी लाट भाजपच्या बाजूनेच पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Speech in Parliament: 'मला वाटते कॉंग्रेसने पुढील 100 वर्षे सत्तेत न येण्याचे ठरवले आहे'- पीएम नरेंद्र मोदींनी साधला निशाणा)

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे उदाहरण देत म्हटले की, 2014, 201, 2019 निवडणुकीमध्ये सातत्याने भाजपला विजय मिळतो आहे. यापूर्वी बोलले जायचे सत्ताधारी पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येत नाही. पण आताहाही ट्रेंड मोडीत निघाला आहे. उत्तर प्रदेशने पहिल्यांदाच हा ट्रेंड मोडीत काढला आहे. भाजपला 2014 मध्ये विजय मिळाला. त्यानंतर पुन्हा 2017 आणि आता 2019 मध्येही हेच पाहायला मिळाले आणि आता 2022 मध्येही असेच घडेल.

भाजप नेहमीच सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवते. भाजप होर्डिंग्जवरही पक्षातील कार्यकर्त्यांचे फोटो पाहायला मिळतात. भजप कार्यकर्त्यांसोबत उभे राहताना मला गर्व वाटतो. जेव्हा मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत उभा राहतो तेव्हा मला कधीच असे वाटत नाही की, मी कोणापेक्षा अधीक मोठा आहे.