प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे, देशांतर्गत बाजारात दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही (Petrol-Diesel Price) वाढत आहेत. गेल्या 19 दिवसात डिझेल 5.95 रुपयांनी महाग झाले, तर 16 दिवसात पेट्रोलचे दर 4.65 रुपयांनी वाढले. महागाईमुळे जनता दररोज त्रस्त आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज (रविवार) म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आज डिझेल 35 पैशांनी वाढले आहे, तर पेट्रोल देखील 35 पैसे प्रति लीटर वाढले आहे.

वाढलेल्या किंमतीनुसार आता एका लिटर पेट्रोलसाठी 105.84 रुपये आणि डिझेलसाठी 94.57 रुपये मोजावे लागणार आहेत. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 34 पैशांनी वाढ झाली आहे व डिझेलच्या किमतीत 37 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. आता येथे पेट्रोलसाठी 111.77 रुपये प्रति लीटर आणि डिझेलसाठी 102.52 रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 90 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थानिक करांच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यांमध्ये वेगवेगळे असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. तेल विपणन कंपन्या दररोज किंमतींचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या रोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करतात.