Petrol-Diesel Excise Duty: खुशखबर! उद्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; सरकारने 5 आणि 10 रुपयांनी कमी केले उत्पादन शुल्क
Representational Image | (Photo Credits: PTI)

दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरकारने देशातील जनतेला मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol and Diesel) उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला या बातमीमुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच केंद्र सरकारने राज्य सरकारांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटचे दर कमी करण्याची विनंती केली आहे.

उत्पादन शुल्कात कपात करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील कर दुपटीने कमी करण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. रब्बी पिकाचा हंगाम सुरू होत आहे. शेतीच्या कामात वापरलेली उपकरणे प्रामुख्याने डिझेलवर चालतात. अशा परिस्थितीत डिझेलचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते, जे संपूर्ण भारतात एकसमान आहे.

अशा इंधनावर आकारले जाणारे व्हॅटचे दर राज्यानुसार भिन्न आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर देशात सर्वाधिक व्हॅट आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अर्थ मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत गगनाला भिडली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलने 100 रुपयांचा पल्ला गाठला आहे. देशातील अनेक महानगरांमध्ये पेट्रोलने 110 रुपयांची पातळी ओलांडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईही वाढली आहे.

संपूर्ण जग सध्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. मात्र त्यामध्येही पेट्रोल, डिझेलसारख्या जीवनावश्यक वस्तूंची चणचण भासू नये असा भारत सरकारचा सातत्याने प्रयत्न आहे. त्याची पुरेशी उपलब्धता नेहमीच असली पाहिजे याची काळजी घेतली जात आहे. (हेही वाचा: अखेर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मिळाली जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी मान्यता)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे., यामुळे सामान्य जनता ट्रस्ट झाली आहे. पेट्रोलच्या दरांवर नजर टाकली तर 28 दिवसांत पेट्रोल 8.85 रुपयांनी महागले आहे. बुधवारी दिल्ली मार्केटमधील इंडियन ऑइल (IOC) पंपावर पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.04 रुपये आणि डिझेल 98.42 रुपये प्रति लिटर आहे.