इन्स्टाग्राम चॅट ग्रुप 'बॉइज लॉकर रूम' (Bois Locker Room) प्रकरणाचा तपास CBI द्वारे करण्यात यावा अशी मागणी करणारी जनहीतयाचिका न्यायालात दाखल करण्यात आली आहे. देव आशीष दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या ग्रुपमध्ये अश्लील संभाषण चालत असे. काही शालेय विद्यार्थिनींची छायाचित्रे मॉर्फ करुन पोस्ट केली जात. या ग्रुप सेक्स आणि सामूहिक बलात्काराबाबतही या ग्रुपच्या माध्यमातून टीप्पणी केली जात असे.
देव आशीष दुबे यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी सीबीआय किंवा एसआयटी द्वारा करण्यात यावी. कारण या घटनेतील सहभागी विद्यार्थी हे श्रीमंत कुटुंबाशी संबंधीत आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या तपासावर दबाव येऊ शकतो. तसेच, गुन्हेगारांना अटक अथवा इतर शिक्षा होण्याची शक्यता कमी होते. (हेही वाचा, DCW: दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वाति मालीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात तक्रार दाखल)
देव आशीष दुबे यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयासमोर सुनावणीसाठी बुधवारी येण्याची शक्यता आहे. वकील दुष्यंत तिवारी आणि ओमप्रकाश परिहार यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारने 'बॉयज लॉकर रूम' प्रकरणाचा भांडाफोड करणाऱ्या मुली आणि महिलांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. जेणेकरुन आरोपी अथवा आरोपींशी संबंधीत मंडळींकडून त्यांच्यावर दबाव अथवा त्यांना इजा पोहोचवली जाऊ नये. आरोपींना लैंगिक गुन्ह्यांपासून लहान मुलांचे संरक्षण कायदा 2012 मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे.