देशात पेटवले गेलेले दिवे (Photo Credit : ANI)

सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. यावर सरकार सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेच, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जनतेचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी आज, 5 एप्रिल रोजी सर्वांनी आपल्या घरातील लाईट्स बंद करून दिवे लावण्याचे आवाहन पीएम मोदी यांनी केले होते. त्यानुसार रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी संपूर्ण देशात दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळाला. देशातील विविध भागात लोकांनी दिवे लावून, फटके फोडून पीएम मोदींच्या या आवाहानाला साथ दिली.

पहा व्हिडिओ - 

कोरोना विषाणूशी लढताना जनतेमध्ये एकजुटीचा संदेश जावा म्हणून पीएम मोदी यांनी हे आवाहन केले होते. 5 एप्रिल रोजी, रात्री 9 वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून, 9 मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्यास सांगितले होते. आता पंतप्रधानांच्या या आधीच्या टाळी व थाळी उपक्रमाप्रमाणे या दिव्यांच्या उपक्रमालाही तुफान प्रतिसाद मिळाला. देशातील विविध भागांत लोकांनी दिवे पेटवून पीएम मोदी यांच्या आवाहानाचे स्वागत केले. यामध्ये अनेक अनेक राजकीय नेते, सेलेब्जही सामील झाले होते.

मात्र दुसरीकडे या मोदींच्या प्रचंड टीकाही झाली होती. कोरोना विषाणू, भारताची स्थिती, यासाठी राबवले जात असलेले उपाय, देशातील आरोग्य समस्या याबाबत बोलण्याऐवजी पंतप्रधानांनी लोकांना दिवे लावायला सांगितले, असे म्हणत अनेकांनी या गोष्टीची चेष्टाही केली होती. मात्र आज आजूबाजूची नकारात्मता विसरून कोरोना विषाणूविरुद्धचा लढा लढण्यासाठी सर्व लोक एकत्र आले होते.