दिल्लीतील सामूहिक बलात्कार (Delhi Gang Rape) प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. दिल्लीत 2014 मध्ये नायजेरियन महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, डीएनए चाचणी दरम्यान पिडीत महिलेच्या शरीरात वीर्याची उपलब्धी नसणे, यामुळे पीडितेचा दावा खोटा ठरत नाही. बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी केवळ पेनिट्रेशन होणे पुरेसे आहे. यासोबतच कनिष्ठ न्यायालयाने आरोपींना सुनावलेल्या शिक्षेतही न्यायालयाने काही बदल केले आहेत.
दोन्ही आरोपींना 30 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, ती आता 20 वर्षांची करण्यात आली. न्यायालयाने नमूद केले की, एक आरोपी अविवाहित आहे आणि दुसऱ्या आरोपीला एक मूल आहे आणि त्याचे पालक आहेत. तसेच या आरोपींना सुधारण्याची संधी नाकारता येणार नाही, त्यामुळे त्यांची शिक्षा कमी केली गेली.
न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सोमवारी हा निर्णय दिला. हा निर्णय त्यांच्या निवृत्तीच्या एक दिवस आधी आला आहे. मंगळवारी त्या दिल्ली उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्या. गुप्ता यांनी 14 वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यांची 23 ऑक्टोबर 2009 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली व 29 मे 2014 रोजी त्या कायम न्यायाधीश बनल्या.
या खटल्यात दोषी ठरलेल्या राज कुमार आणि दिनेश यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले होते, ज्यामध्ये त्यांना दोषी ठरवून 30 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता आणि न्यायमूर्ती पूनम ए. बंबा यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले की, पीडितेचे विधान आणि पुरावे केवळ विश्वसनीय नाहीत तर इतर तथ्ये आणि परिस्थिती देखील सिद्ध करतात की तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या ट्रायल कोर्टाच्या निकालात कोणतीही कमतरता दिसत नसल्याचे सांगितले.
ही घटना 2014 सालची आहे. त्या वर्षी 18-19 जूनच्या मध्यरात्री नायजेरियन महिला जनकपुरी येथील मित्राच्या घरी पार्टी करून घरी परतत होती. ती रस्त्यावर ऑटोरिक्षा शोधत होती. यादरम्यान एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि आरोपींनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले. दोघांनी महिलेला एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. गुन्हा केल्यानंतर त्यांनी पुन्हा महिलेला आपल्या कारमध्ये बसवले आणि मेट्रोच्या खांबाजवळ सोडून पळ काढला. दोघांनी महिलेची बॅगही हिसकावून घेतली होती. या बॅगेत मौल्यवान वस्तू होत्या. (हेही वाचा: Uttarpradesh Sexual Abuse Case: सहारनपूर येथे बालसुधारगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार; ह्या संदर्भात 5 कर्मचाऱ्यांना बडतर्फ)
यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. महिलेने नमूद केलेल्या घराच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर महिलेच्या डीएनए चाचणी अहवालाला बचाव पक्षाच्या वकिलांनी आव्हान दिले होते. डीएनए विश्लेषणातून तिच्यावर दोन व्यक्तींनी बलात्कार केल्याचे सिद्ध झाले नाही. मात्र न्यायालयाने म्हटले की, वीर्य न मिळाल्याने महिलेचा दावा खोटा ठरत नाही की तिच्यावर दोन पुरुषांनी बलात्कार केला होता. बलात्काराचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी पेनिट्रेशन होणे पुरेसे आहे.