Pegasus Spy case: पेगॅसस प्रकरणावरुन विरोधक आक्रमक, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा
Spying| Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

पेगॅसस प्रकरणावरुन (Pegasus Spy Case) विरोधक जोरदार आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटताना दिसत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) काल (19 जुलै) सुरु झाले आहे. या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. कालप्रमाणे आजचा दिवसही पेगसास हेरगिरी प्रकरणावरुन जोरदार गाजला. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विरोधकांच्या आक्रमकतेमुळे कामकाज तहकूब करावे लागले. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला नाराज झाले. त्यांनी सांगितले की, विरोधकांना ज्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे त्यांनी त्याबाबत नोटीस द्यावी. सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे. प्रत्येक वेळी अशी घोषणाबाजी करणे योग्य नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की,पेगसासच्या माध्यमातून अनेक लोकांचे फोन टॅप केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. काहींची नावे पुढे आली आहेत. काहींची अद्याप आली नाहीत. अश्विनी वैष्णव हे केंद्रात मंत्री आहेत. तरीही त्यांचे फोन टॅप झाल्याचे पुढे आले आहे. हे फोन टॅपींग प्रकरण केवळ भारतात घडले नाही. जगभरातील इतर देशांमध्येही घडले आहे. त्यामुळे हा भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार वैगेरे असल्याचे मोदी सरकारने सांगू नये. या प्रकरणाची चौकशी करुन वास्तव काय आहे ते सांगावे. संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, इंस्त्राईलचे पंतप्रधान नेत्यानाहू आणि पंतप्रधान मोदी यांचे मिठ्या मारतानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. नेत्यानाहूंच्या प्रचाराच्या वेळी मोदींचे पोस्टर लावलेले जगाने पाहिलेत. त्यामुळे हा भारतीय लोकशाहीला धोका वैगरे असल्याचे त्यांनी सांगत बसू नये. थेट पीगाससबाबत बोलावे. (हेही वाचा, Project Pegasus: हे काम कोणाचे? 'पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणावरुन भाजप खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांचा मोदी सरकारला सवाल)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तिसिंह गोहिल यांनी मागणी केली की, पेगासस स्पायवेअर वादावर एक संयुक्त संससदीय समिती (JPC) स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातून सभागृहासमोर नेमके चित्र पुढे येईल. या प्रकरणावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारने हे स्पायवेअर इस्राईलकडून खेरेदी केले होते का? असाही सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला. पेगासस प्रकरणावरुन सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.

आम आदमी पक्षाचे संसदीय सचिव संजय सिंह यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली पेगसस स्पायवेअर प्रकरणाची चौकशी व्हावी. त्यासाठी एक उच्चस्तरीय आयटी समिती गठीत करावी. देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, पत्रकार आणि राजकीय नेत्यांच्या फोनची हेरगिरी केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.

तृणमूल काँग्रेस खासदारांनी या प्रकरणावरुन आंदोलन केले. तर, टीएमसी नेता सुखेंदु शेखर रॉय यांनी कामगाज स्थगित करण्यासाठी 267 अन्वये पेगासस प्रकरणावर तातडीने चर्चा घेण्यात यावी अशी मागणी केली.