Subramanian Swamy |(Photo Credits: Facebook)

पेगॅसस हेरगिरी (Project Pegasus) तंत्रज्ञान वापरुन जगभरातील अनेक देशांतील सरकारांनी आपल्याच देशातील काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांवर पाळत ठेवल्याचे पुढे आले आहे. यात भारतातीलही काही महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार आणि इतर लोकांवर पाळत ठेवल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. भारत सरकारनेच ही पाळत ठेवल्याचा आरोप आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सरकारवर टीकेची झोड उडवली असतानाच एका भाजप खासदारानेही केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. सुब्रहमण्यम स्वामी (Subramanian Swamy) असे या खासदाराचे नाव आहे. असा काही प्रकार देशात घडत असेल याबाबत आश्चर्य व्यक्त करत 'हे काम मोदी सरकारचे नाही तर मग कोणाचे?' सवाल उपस्थित केला आहे. तसेच, केंद्रातील भाजप सरकारने या आरोपांचे उत्तर द्यावे, प्रकरणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी असेही स्वामी यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांमधून आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, भारतातील आतापर्यंत 40 लोकांचे फोन टॅप झाल्याचे आणि त्यांच्यावर हेरगीरी केल्याचे पुढे आले आहे. यात काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्यांचा स्टाफ यासह विविध प्रसारमाध्यमांचे पत्रकार आणि मुक्तपत्रकार आदींजेही फोन टॅप झाल्याचे पुढे आले आहे. विरोधी पक्षांनी संसदेत यावर जोरदार आवाज उठवला आहे. विशेष म्हणजे भारत सरकारमध्ये मंत्री असलेल्या अश्विनी वैष्णव यांचाही फोन टॅप झाल्याचे पुढे आले आहे. याशिवाय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह इतरही काही नावांचा यात समावेश आहे .

सुब्रहमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'पेगॅसस स्पायवेअर ही एक व्यावसायिक कंपनी आहे. ती दिलेल्या कंत्राटानुसारच काम करते. त्यामुळे त्यांना भारतातील लोकांवर पाळत ठेवण्यासाठी कोणी किती पैसे दिले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टींमागे भारत सरकार नाही तर मग कोण? हे भारतीय जनतेला समजणे आवश्यक आहे', असे सुब्रहमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा, Pegasus Software द्वारे मोदींचे कॅबिनेट मंत्री, आरएसएस नेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन होत आहेत टॅप? Subramanian Swamy शेअर करणार डिटेल्स)

सुब्रमण्यम स्वामी ट्वीट

प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात केलेल्या दाव्यानुसार, इस्रायली गुप्तहेर संस्था असलेल्या ‘एनएसओ’ निर्मित ‘पेगॅसस’ तंत्रज्ञान वापरु देशातील अनेक राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकत्यांचे फोन हॅक करण्यात आले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. . ‘द वायर’ नावाच्या संकेतस्थळाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.