Pegasus Snooping Controversy: पेगॅसस प्रकरणी राहुल गांधी लोकसभेत मांडणार स्थगन प्रस्ताव, 9 विरोधी पक्षांचा पाठिंबा
Rahul Gandhi | (Photo Credit : Facebook)

पेगसस (Pegasus Scandal) प्रकरणावरुन देशभरात कल्लोळ सुरु आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली 10 विरोधी पक्ष आज (बुधवार, 28 जुलै) लोकसभेत (Lok Sabha) स्थगन प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पेगसस ( Pegasus Snooping Controversy) प्रकरणावर चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे. बुधवारी सकाळी दोन्ही सभागृहातील (राज्यसभा, लोकसभा) विरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीस, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लीकार्जून खडगे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, शिवसेना नेते संजय राऊत, यांच्यासह इतरही पक्षांचे नेते उपस्थि त होते. या बैठकीत सरकारला पेगॅससच्या मुद्द्यावरुन घेरण्याबाबत रणनिती ठरल्याचे समजते.

पेगॅससच्याच मुद्द्यावरुन मंगळवारीही काँग्रेसच्या संसदीय कार्यालयात राहुल गांधी यांच्यासोबत विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत देशातील प्रमुख नेत्यांवर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा मुद्दा अधोरेखीत करण्यात आला. या बैठकीला काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी, डीएमकेच्या कनिमोझी, टीआर बालू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे अरविंद सावंत, नॅशनल काँन्फरन्सचे हसनैन मसूदी, बसपाचे रितेश पांडेय, आरएसपीचे एन के रामचंद्रन आणि आययूएमएल चे मोहम्मद बशीर उपस्थित होते. दरम्यान, सर्व विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याबाबत पाठींबा दिला. अपवाद मात्र बसपाचा. बसपा या प्रस्तावाला पाठिंबा देणार किंवा नाही, याबाबत अद्याप निश्चितता नाही. तृणमूल काँग्रेस पक्षाचे कोणताही नेताही या बैठकीस उपस्थित नव्हता. (हेही वाचा, Shiv Sena on BJP Government: 'पेगॅसस'चे बाप कोण? केंद्राच्या संमतीशिवाय हे होऊच शकत नाही, शिवसेनेचा केंद्र सरकारवर हल्ला)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

दरम्यान, पेगॅसस प्रकरणावरुन (Pegasus Spy Case) विरोधक जोरदार आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटताना दिसत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 19 जुलै पासून झाले. या अधिवेशनात प्रत्येक दिवस पेगसास हेरगिरी प्रकरणावरुन जोरदार गाजतो आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विरोधकांच्या आक्रमकतेमुळे कामकाज तहकूब करावे लागले आहे. आजही सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.