Parliamentary (File Image)

नवी दिल्लीमध्ये आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. 18-22 सप्टेंबर दरम्यान या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस विधेयक 2023, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयके, अ‍ॅडव्होकेट्स अमेंडमेंट बिल 2023 आणि प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियडिकल बिल 2023 यासारखी विधेयकं या दरम्यान संसदेमध्ये मांडली जाणार आहेत. दरम्यान आज संसदेच्या जुन्या आणि उद्या (19 सप्टेंबर) गणेश चतुर्थीच्या शुभ मुहुर्तावर संसदेच्या नव्या इमारती मध्ये कामाचा श्रीगणेशा होणार आहे.

18-22 सप्टेंबरच्या विशेष अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्यासाठी भाजपा, कॉंग्रेस पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात पाच बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या अधिवेशनाच्या घोषणेनंतर 'वन नेशन वन इलेक्शन' आणि देशाचे नाव 'इंडिया' वरुन 'भारत' या दोन गोष्टींवरून प्रस्ताव आणले जाऊ शकतात याची चर्चा सुरू झाली आहे.

कसं असेल आजपासून सुरू होणारं विशेष अधिवेशन?

आजपासून सुरू होणारं विशेष अधिवेशन पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनात सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी (19 सप्टेंबर) जुन्या संसद भवनातच फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर खासदार नवीन संसद भवनात पोहोचतील. अधिवेशनाची बैठक 19 सप्टेंबरला नवीन इमारतीत होणार असून त्यात 20 सप्टेंबरपासून नियमित कामकाज सुरू होणार आहे. काल रविवारी (17 सप्टेंबर) सकाळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी नवीन संसद भवनात राष्ट्रध्वज फडकावला.

राज्यसभेमध्ये आज पहिल्या दिवशीच देशाच्या 75 वर्षांच्या कारकीर्दीचा त्यामध्ये आढावा घेत राज्यसभेत चर्चा होणार आहे. सरकार कडून या विशेष सत्रातील अजेंडा जारी करण्यात आला आहे. 17 ऑगस्टला पावसाळी अधिवेशनाचा यंदा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आजपासून हे हिवाळी अधिवेशनापूर्वीचं विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.