कोरोना व्हायरस संकटाच्या सावटाखाली दिल्लीमध्ये सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र काल शेतकर्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत काही खासदारांनी गदारोळ घातला होता. त्याप्रकरणी आज राज्यसभेत व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित 8 खासदारांचे पुढील आठवडाभरासाठी निलंबन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचा देखील समावेश आहे. सोबतच डेरेक ओ'ब्रायन, संजय सिंह, के.के. रागेश, रिपुन बोरा, डोला सेन, सैयद नजीर हुसैन आणि एलामरम करीम यांचा समावेश आहे. कृषी विधेयकाला विरोध करताना काल (20 सप्टेंबर) काहींनी थेट उपसभापतींसमोर (Rajya Sabha Deputy Chairman) जाऊन त्यांचा माईक खेचण्याचा प्रयत्न केला होता. पुस्तिकांच्या प्रती फाडण्यात आल्या होत्या. Farm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या.
राज्यसभेचे सभापती व्यकंय्या नायडू यांनी आज सकाळी कामकाज सुरू करताना या प्रकाराची दखल हा राज्यसभेसाठी काळा दिवस होता. जर काल मार्शल्स आले नसते तर खासदारांनी उपसभापतींची काय अवस्था केली असते याचा विचार देखील करवत नाही अशी भावना व्यक्त करत संबंधित 8 खासदारांना निलंबित केलं आहे. सोबतच विरोधकांकडून उपसभापती हरिवंशच्या विरूद्ध खासदारांनी सादर केलेला अविश्वास प्रस्ताव देखील नियमबाह्य असल्याचं सांगत त्यांनी तो फेटाळून लावला आहे. त्यानंतर काही काळ राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं.
ANI Tweet
TMC's Derek O'Brien & Dola Sen, AAP's Sanjay Singh, INC's Rajeev Satav, Ripun Bora & Syed Nasir Hussain, CPI(M)'s KK Ragesh & Elamaram Karim suspended for one week for unruly behaviour with the Rajya Sabha Deputy Chairman yesterday
(file pics) pic.twitter.com/0QmresStns
— ANI (@ANI) September 21, 2020
काल झालेल्या राज्यसभेतील गदारोळाबाबत सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'अशाप्रकारची घटना आतापर्यंत राज्यसभा किंवा लोकसभा मध्ये झालेली नाही. कालचा राज्यसभेत झालेला प्रकार नींदनीय आहे तो सभागृहाच्या प्रतिमेला साजेसा नाही.' अशी प्रतिक्रिया देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. तर केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील विरोधकांच्या गोंधळाचा समाचार घेतला आहे.