
पाकिस्तानमधून आलेल्या सीम हैदर (Seema Haider) आणि नोएडामधील सचिन यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. सीमा ही एक हेर असून तिला पाकिस्तान (Pakistan) लष्कराने भारतामध्ये पाठवल्याचे दावे केले जात आहेत. यूपी एटीसीदेखील त्याच दृष्टीने तपास करत आहे. सीमापार प्रेम प्रकरणात, हेरगिरीच्या शक्यतेचा तपास तीव्र झाला आहे. दुसरीकडे, सीमा हैदरने तिचे वकील डॉ. एपी सिंह यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेचा अर्ज पाठवला आहे. याचिकेत सीमाने सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर भारताचे नागरिकत्व द्यावे, भारतात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
याचिकेसोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात सीमा हैदर ऐवजी सीमा मीना असे पूर्ण नाव लिहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याशिवाय तिने आपल्या लग्नाची छायाचित्रेही पाठवली आहेत. सीमाचे वकील डॉ. एपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाने नेपाळमध्ये ग्रेटर नोएडा येथील सचिन मीनाशी लग्न केले होते, त्यामुळे आता ती भारताची सून आहे. याच आधारावर सीमाला भारतीय नागरिकत्व हवे आहे.
उत्तर प्रदेश एटीएसने सीमा हैदरची दोन दिवस चौकशी केली होती, त्यानंतर सीमावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार लटकू शकते. एटीएसने सीमाचा पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयशी असलेल्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर तिने सांगितले की, तिला आयएसआयचे नावही माहित नाही. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, सीमाने आता आपली याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवली आहे. (हेही वाचा: प्रियकरासाठी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानी महिलेला घेतले ताब्यात; पाक लष्कराशी कथित संबंधाबाबत होणार चौकशी)
उत्तर प्रदेश पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सीमाकडून आतापर्यंत केलेल्या चौकशीच्या आधारे ती पाकिस्तानी गुप्तहेर आहे असे म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, काही प्रश्नांच्या उत्तराने एटीएस अजूनही समाधानी नाही. त्यानंतर आता पुन्हा सीमाची चौकशी करता येईल. सीमाशिवाय तिचा प्रियकर सचिनचीही चौकशी करण्यात आली आहे. सीमाला लवकरच पाकिस्तानात पाठवले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. सीमाचे म्हणणे आहे की, जर तिला पाकिस्तानात पाठवले तर ती जिवंत राहणार नाही.