Padma Awards 2024 Winners List: केंद्राकडून 132 पद्म पुरस्कार जाहीर; विजेत्यांमधे महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
Padma Awards

Padma Awards 2024 Winners List: दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या (75th Republic Day) निमित्ताने देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार (Padma Awards 2024)- पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली जाते. नुकतेच सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. कला, सामाजिक कार्य,  विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च/एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. वर्ष 2024 साठी, राष्ट्रपतींनी खालील यादीनुसार 2 विभागून पुस्कारांसह  (एक पुरस्कार गणला जातो) 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली आहे. या यादीत 5 पद्मविभूषण,  17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिला आहेत आणि या यादीत परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील 8 व्यक्ती आणि 9 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.

अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता कोनिडेला चिरंजीवी, प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम् आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमधे महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. यात, सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ञ आश्विन मेहता, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक,  कुंदन व्यास, जेष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे.

विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना पद्मश्री आणि  6 पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. व्यावसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे. (हेही वाचा: Republic Day 2024: महिला कलाकार भारतीय वाद्ये वाजवून करणार पथसंचलनाची सुरुवात, 13,000 विशेष पाहुण्यांचा सहभाग; जाणून घ्या कसा असेल यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा)

बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून . जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी  उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे. 50 देशांतील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली. गोव्यातले संजय अनंत पाटील यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.नैसर्गिक शेतीची कास धरत त्यांनी शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे.